कर्जतमध्ये दोन कॅफेंवर पोलिसांची धडक कारवाई
अवैध प्रकारांना आश्रय; कॅफे चालकांविरुद्ध गुन्हे दाखल


कर्जत : शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या काळदाते कॉम्प्लेक्समध्ये सुरू असलेल्या दोन कॅफेंमध्ये बेकायदेशीर प्रकारांना मोकळीक दिली जात असल्याचे उघडकीस आले असून, कर्जत पोलिसांनी या दोन्ही कॅफेंवर छापा टाकत कारवाई केली. अश्लील कृत्यांसाठी जागा उपलब्ध करून देणे तसेच कोणताही अधिकृत परवाना नसताना व्यवसाय चालविल्याप्रकरणी संबंधित कॅफे चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत…

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, ‘आपलं कॅफे’ आणि ‘मराठी कॅफे’ येथे तरुण मुलामुलींना बंदिस्त जागा तासावर भाड्याने देण्यात येत होती. या बदल्यात ग्राहकांकडून तासाप्रमाणे पैसे घेतले जात असल्याची माहिती खात्रीशीररीत्या मिळाल्यानंतर सोमवारी (दि. ३०) दुपारी कर्जत पोलिसांनी अचानक छापा टाकला.
छाप्यादरम्यान दोन्ही कॅफेंमध्ये कोणताही वैध परवाना नसताना खाद्यपदार्थांची विक्री सुरू असल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संजय मच्छिंद्र सानप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित कॅफे चालकांविरुद्ध मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदर कारवाई प्रवीणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सोपान शिरसाठ यांच्या आदेशाने करण्यात आली. या छाप्यात पोलीस हेड कॉन्स्टेबल थोरात, शिंदे तसेच पोलीस कॉन्स्टेबल कोल्हे, सानप, सोनवणे आणि गोलवाड सहभागी होते.




