कर्जत शहरात वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई…
वाहतूक कोंडीला आळा : कर्जतात ६० वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई


कर्जत : – शहरातील वाढती वाहतूक कोंडी, बेदरकार वाहनचालक आणि उघडपणे मोडले जाणारे नियम याला आळा घालण्यासाठी कर्जत पोलिसांनी सोमवारी (दि. २९) जोरदार कारवाई केली. आठवडी बाजारामुळे शहरात प्रचंड गर्दी असतानाच नियम झुगारणाऱ्या वाहनधारकांवर पोलिसांनी थेट दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला…
पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेत मुख्य रस्त्यावर वाहतूक अडवणारे अनधिकृत पार्किंग, बसस्थानक परिसरात विनाकारण फेऱ्या मारणारी वाहने, ट्रिपल सीट दुचाकीस्वार, विना परवाना वाहनचालक, नंबर प्लेट नसलेली किंवा फॅन्सी नंबर प्लेट असलेली वाहने यांच्यावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले. याशिवाय काळ्या काचा लावलेली वाहने तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली…

दिवसभर चाललेल्या या मोहिमेत तब्बल ६० प्रकरणे नोंदवण्यात आली असून, त्यातून ७३ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई पोलीस हेड कॉन्स्टेबल थोरात, पोलीस कॉन्स्टेबल सानप आणि दीपक कोल्हे यांच्या पथकाने केली.
दरम्यान, वाहनधारकांनी मुख्य रस्त्यांवर वाहने उभी करू नयेत, केवळ नियुक्त पार्किंगमध्येच पार्किंग करावे तसेच दुचाकी रस्त्याच्या कडेला आखलेल्या पांढऱ्या पट्ट्यांच्या आतच लावाव्यात, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. नियम मोडणाऱ्यांविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे…




