राशीन परिसरात गोवंशाची बेकायदेशीर साठवणूक; कर्जत पोलिसांची दोन ठिकाणी कारवाई..


(कर्जत प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील राशीन परिसरात गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या साठवणूक केल्याप्रकरणी कर्जत पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाया करत संबंधितांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
११ जानेवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, राशीन येथील सोनाळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत काटवन परिसरात गोवंश जातीची जनावरे चारा-पाण्याविना कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आली आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक शिरसाट, पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण बारवकर, पोलीस कॉन्स्टेबल योगेश सुपेकर, अर्जुन पोकळे, दीपक कोल्हे व मनोज मुरकुटे यांनी पंचांसह घटनास्थळी छापा टाकला…

या कारवाईत सोनाळवाडी रस्त्यालगत काटवनात सुमारे १ लाख ३० हजार रुपये किमतीची एक पांढऱ्या रंगाची जर्सी गाय व पाच कालवडी दाव्याने बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल योगेश सुपेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजू मेहबूब कुरेशी, मालीस मौला कुरेशी व तोफिक कुरेशी (सर्व रा. राशीन, ता. कर्जत) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, याच दिवशी सायंकाळी सुमारे ४ वाजता कर्जत पोलिसांनी राशीन गावच्या शिवारातील स्मशानभूमी जवळील काटवन परिसरात दुसरी कारवाई केली. येथे सुमारे ३० हजार रुपये किमतीची एक गावरान गाय चारा-पाण्याविना निर्दयपणे कत्तलीसाठी बांधून ठेवलेली आढळून आली. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल मनोज मुरकुटे यांच्या फिर्यादीवरून समीर अन्सार काझी (रा. राशीन) याच्याविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही संपूर्ण कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट यांच्या आदेशानुसार करण्यात आली. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल किरण बारवकर व सुतार करत आहेत.




