सिद्धटेक येथील भीमा नदीपात्रात ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला…
कापरेवाडी येथील राहुल बोंगाणेचा मृत्यू; आकस्मिक मृत्यूची नोंद...


कर्जत (प्रतिनिधी) : – कर्जत तालुक्यातील सिद्धटेक परिसरात भीमा नदीच्या पात्रात एका ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. राहुल चंदू बोंगाणे (वय ३०), रा. कापरेवाडी (ता. कर्जत), सध्या हडपसर, पुणे असे मृत तरुणाचे नाव आहे.
राहुल हा दि. २७ डिसेंबर रोजी घरातून बाहेर पडल्यापासून बेपत्ता होता. त्याचा मोबाईल फोनही बंद लागत असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली होती. दरम्यान, राहुलचे शेवटचे लोकेशन सिद्धटेक परिसरात असल्याचे समजल्याने त्याचे मामा चंद्रकांत मारुती मोहिते यांनी सिद्धटेक येथे येऊन त्याचा शोध सुरू केला होता.

रविवार, दि. २८ डिसेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास सिद्धटेक येथील पोलीस पाटलांना भीमा नदीपात्रात एक मृतदेह तरंगताना दिसून आला. याबाबतची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिस कर्मचारी व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला. तपासणीअंती सदर मृतदेह राहुल बोंगाणे याचाच असल्याचे निष्पन्न झाले.

यानंतर राहुलचा मृतदेह रुग्णवाहिकेतून कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. या घटनेबाबत चंद्रकांत मोहिते यांनी दिलेल्या माहितीवरून कर्जत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
राहुलच्या आकस्मिक मृत्यूने कापरेवाडी व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे…




