कर्जतमध्ये मराठा समाज आक्रमक, महंत नामदेव शास्त्री यांच्या वक्तव्याचा निषेध

कर्जत: भगवानगड येथील महंत नामदेव शास्त्री यांच्या कथित वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ आज (दि. 1 फेब्रुवारी 2025) कर्जत शहरातील छत्रपती चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते.
सकल मराठा समाज कर्जत तालुका जिल्हा अभियानाचे प्रमुख समन्वयक शिवश्री रावसाहेब महादेव धांडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. समाजाच्या भावना दुखावणारे वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
रास्ता रोकोमुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि आंदोलकांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. अखेर पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
या आंदोलनामुळे संपूर्ण कर्जत शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखत परिस्थिती नियंत्रणात आणली.