सामाजिक संघटनांच्या कार्यामुळे कर्जतची ओळख राज्य व देशपातळीवर पोहोचली” – माजी जि. प. सदस्य प्रवीण घुले
कर्जत /प्रतिनिधी दि. २० सर्व घटकांना बरोबर घेऊन शहराचा विकास करू असे प्रतिपादन नवनिर्वाचित नगराध्यक्ष रोहिणीताई घुले यांनी केले.गेल्या साडेचार वर्षापासून वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन आणि स्वच्छतेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने कर्जत नगरपंचायतच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा वृक्षारोपणाने आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सौ. घुले या बोलत होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष संतोष मेहत्रे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, भास्कर भैलुमे, सुनील शेलार, लालासाहेब शेळके सर्व सामाजिक संघटनेचे मार्गदर्शक सेवानिवृत्त वनाधिकारी अनिल तोरडमल यांच्या सर्व सामाजिक संघटनेचे पर्यावरण प्रेमी महिला पुरुष श्रमप्रेमी उपस्थित होते.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष संतोष मेहेत्रे म्हणाले की, आपण करीत असलेल्या पर्यावरण संवर्धनाच्या कार्याला अधिकाधिक बळ कसे देता येईल याविषयी नगरपंचायत सकारात्मक निर्णय घेईल. यावेळी बोलताना माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले म्हणाले की, श्री संत गोदड महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीला सर्व सामाजिक संघटनेच्या कार्यामुळे कर्जत आणि परिसराचे नाव जिल्हा,राज्य आणि देशपातळीवर पोहोचले आहे.
या कार्याच्या माध्यमातून कर्जतची एक “पर्यावरण समृद्ध कर्जत” अशी एक वेगळी ओळख निर्माण करण्यात सर्व सामाजिक संघटनेचा वाटा आहे.आगामी काळात नूतन पदाधिकारी नगरपंचायत च्या माध्यमातून सर्व सामाजिक संघटनेला बरोबर घेऊन प्रत्येक कार्यात सर्वांना बरोबर घेऊन सामावून कर्जत शहराचा विकास साधण्यात येईल. तसेच शहराचा चेहरा मोहरा बदलण्यात येईल आमचे मार्गदर्शक विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत नगरपंचायत च्या माध्यमातून कर्जत शहर आणि परिसराचा लौकिक वाढविण्यात येईल.असे प्रवीण घुले म्हणाले.
सर्व सामाजिक संघटना आणि कर्जत नगरपंचायत यांच्या समन्वयातून एक पर्यावरण समृद्ध स्वच्छ सुंदर हरित कर्जत निर्माण करण्याचा संकल्प आपल्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपल्या कार्यकाळात व्हावा अशी अपेक्षा सर्वसामाजिक संघटनेचे मार्गदर्शक तथा सेवानिवृत्त वनाधिकारी अनिल तोरडमल यांनी व्यक्त केली. यावेळी सर्वसामाजिक संघटनेचे शिलेदार अशोक नेवसे यांनी सूत्रसंचालन केले तर भाऊसाहेब रानमाळ यांनी आभार मानले.