कर्जत नगरपंचायतीचा सर्वांगीण विकास हाच माझा प्रमुख उद्देश ; रोहिणी घुले
कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदी रोहिणी सचिन घुले यांची नुकतीच निवड झाल्यानंतर त्यांच्या सन्मानार्थ एक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. हा सत्कार समारंभ चंद्रकांत काळोखे आणि बाळासाहेब लोंढे यांच्या वतीने कर्जत नगरपंचायत कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडला.
या वेळी नगरसेवक, नगरपंचायतचे अधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सत्कार समारंभात रोहिणी घुले यांचा पुष्पगुच्छ, शाल आणि श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. यानंतर उपस्थितांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि कर्जतच्या विकासासाठी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला.
सत्कारप्रसंगी बोलताना रोहिणी सचिन घुले यांनी उपस्थितांचे मन:पूर्वक आभार मानले. त्यांनी सांगितले की, “माझ्यावर टाकलेला विश्वास मी कायम राखीन. कर्जत नगरपंचायतीचा सर्वांगीण विकास हाच माझा प्रमुख उद्देश असेल. जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध राहीन.”
सत्कारप्रसंगी नगराध्यक्ष रोहिणी ताई घुले यांच्यासह सचिन (भैया) घुले पाटील, भास्कर भैलुमे (नगरसेवक न.पं., कर्जत), भाऊसाहेब तोरडमल (नगरसेवक न.पं., कर्जत)चंद्रकांत काळोखे बाळासाहेब लोंढे, पिंटू उकिरडे, यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.
आदर्श बहुजन शिक्षक संघ (इब्टा), कर्जतच्या वतीनेही सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे सर्व पदाधिकारी व इब्टा प्रेमी शिक्षक बांधव उपस्थित होते.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक विभागीय अध्यक्ष नवनाथ अडसूळ, अहिल्यानगर जिल्हा सचिव अशोक नेवसे, बहुजन मंडळाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय गदादे, कर्जत तालुकाध्यक्ष श्याम राठोड, कचरू पंडित, संतोष डहाळे, बाळासाहेब नवले आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन सुयोग्य आणि उत्साहात पार पडले. या निमित्ताने एक सकारात्मक सामाजिक वातावरण निर्माण झाले असून नवीन नगराध्यक्षांच्या नेतृत्वात कर्जत शहरात नवचैतन्याचे वारे वाहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.