अहिल्यानगर जिल्ह्यात नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास तसेच ४३० रुग्ण खाटांचे रुग्णालयास शासनाची मान्यता

समृद्ध कर्जत वृत्तसेवा :- महाराष्ट्र शासनाने ग्रामीण व दुर्गम भागात आरोग्यसेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार, अहिल्यानगर जिल्ह्यात १०० विद्यार्थी क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्नित ४३० रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे. हा निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त ६ मे २०२५ रोजी पार पडलेल्या मा. मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला असून, यामुळे जिल्ह्याच्या आरोग्यसेवेत क्रांतिकारी बदल दिसू लागणार आहेत.
या नव्याने स्थापन होणाऱ्या संस्थेचे नाव “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अहिल्यानगर” असे असेल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त हा निर्णय घेतल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
महाविद्यालयासाठी जिल्ह्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा सामान्य रुग्णालय, मालमत्ता व मनुष्यबळ पुढील ७ वर्षांसाठी वैद्यकीय शिक्षण विभागास विनामूल्य देण्यात येणार आहे.
आवश्यक स्थावर जागेबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली गठित मंत्री समितीमार्फत घेतला जाईल.
या प्रकल्पासाठी एकूण रु. ४८५.०८ कोटी निधीची तरतूद करण्यात आली आहे, यामध्ये रु. ३६५.७५ कोटी अनावर्ती खर्च व पहिल्या चार वर्षांसाठी रु. १२३.३३ कोटी आवर्ती खर्च यांचा समावेश आहे.
चौथ्या वर्षांनंतर दरवर्षी सुमारे रु. ४३.२१ कोटी इतका आवर्ती खर्च अपेक्षित असून त्यासाठीही निधीची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे.
स्वच्छता, आहार, सुरक्षा, वस्त्र स्वच्छता यांसारखी कामे बाह्य सेवा पुरवठादारांमार्फत करण्यात येणार आहेत.
सद्यस्थितीत, या संस्थेचे कामकाज तात्पुरत्या स्वरूपात सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासाठी विविध विभागांचे आणि समित्यांचे मंजुरी आदेश प्राप्त झाले असून, आवश्यक पदनिर्मिती व बांधकामांना मंजुरी देण्यात आली आहे.
हा निर्णय केवळ अहिल्यानगरसाठीचनव्हे, तर राज्याच्या ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्यसेवांच्या विस्ताराच्या दृष्टीनेही मैलाचा दगड ठरणार आहे. स्थानिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणासाठी आता दूर जाण्याची गरज भासणार नाही आणि जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सेवा स्थानिक पातळीवरच उपलब्ध होणार आहेत.
— महाराष्ट्र शासन, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग