राशीनमधील जुगारप्रकरणी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव; कारवाईची मागणी तीव्र

राशीन (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) – गावात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या पत्त्यांच्या क्लबच्या माध्यमातून अवैध जुगार व्यवसायावर कारवाई करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी आता जिल्हाधिकारी राकेश ओला यांच्याकडे अधिकृत निवेदन दिले आहे. या निवेदनाद्वारे गावातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनत चालल्याचे सांगत तातडीची कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.
विकी प्रकाश अडसूळ यांनी या निवेदनाचे नेतृत्व करत जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले असून, या जुगार अड्ड्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. “हे अड्डे खुलेआम चालत असून, त्यामागे पोलिस वा स्थानिक प्रशासनाचा वरदहस्त असल्याची शंका नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे,” असा आरोपही करण्यात आला आहे.
“आम्ही यापूर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्याकडे तक्रार केली होती. मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. त्यामुळे आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे,” असे अडसूळ यांनी सांगितले.
गावात रोज लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी जर लवकरच कारवाई झाली नाही, तर आंदोलनाचा इशाराही दिला आहे. यामुळे आता जिल्हा प्रशासन या प्रकरणाकडे कशा प्रकारे पाहते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ग्रामस्थांचा इशारा :
“जर प्रशासनाने यावर त्वरीत कारवाई केली नाही, तर आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल. यासाठी संपूर्ण जबाबदारी पोलीस व प्रशासनाची असेल,” असा इशाराही यावेळी देण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसली, तरी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन गेल्यामुळे आता प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.