कारागृहातून पळण्याचा प्रयत्न फसला; आरोपीने पोलिसावर केला हल्ला, गुन्हा दाखल

कर्जत, ता. ८ मे २०२५ (प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यातील दुय्यम कारागृहात बंदिस्त असलेल्या एका आरोपीने कारागृहातून पलायन करण्याचा प्रयत्न करत असताना पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करून दुखापत केली. या प्रकरणी पोलिसांनी गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल केला असून, आरोपीला ताब्यात घेत तपास सुरू करण्यात आला आहे.
सदर घटना दिनांक ७ मे २०२५ रोजी सकाळी ७.१५ वाजण्याच्या सुमारास कर्जत येथील दुय्यम कारागृहात घडली. बंदिस्त आरोपीने कायदेशीर पोलीस रखवालीत असताना पलायन करण्याचा प्रयत्न केला.
कर्जत पोलीस स्टेशन येथे गुन्हा क्रमांक २८१/२०२५ प्रमाणे भारतीय नवसंहिता (BNS) कलम २६२, १३२, १२१(१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी म्हणून पोलीस कर्मचारी क्रमांक २८४० लहू रामा घोलवाड (वय ३३), नेमणूक कर्जत पोलीस स्टेशन यांनी तक्रार दिली आहे.
शिवा काळे (वय २६), रा. दुय्यम कारागृह, कर्जत, जिल्हा अहिल्यानगर, असे आरोपीचे नाव असून तो बराक क्रमांक तीनमध्ये बंदिस्त होता. त्याने त्या बराकेच्या समोरील लोखंडी गज कापून पळून जाण्याचा प्रयत्न केला.
फिर्यादी पोलीस अधिकारी यांनी आरोपीला पळून जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने त्यांच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत केली. झटापटीनंतर आरोपीला पुन्हा ताब्यात घेण्यात आले.
जखमी पोलिसाला तातडीने उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बोराडे करीत आहेत. तपासकार्य वरिष्ठ पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या घटनेनंतर माननीय SDPO विवेकानंद वखारे, पो.नि. दौलतराव जाधव, पोसई ना-हेडा यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची माहिती घेतली.