अध्यक्षांनी स्वतः ध्वजारोहण न करता प्रमुख पाहुण्यांना मान; परीटवाडी शाळेचा आदर्श


राशीन (प्रतिनिधी) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परीटवाडी येथे सोमवार दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी राशीन येथील सुप्रसिद्ध सर्जन डॉ. नितीनजी खरात हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश गायकवाड यांनी स्वतः ध्वजारोहण न करता प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून आदराची व संस्कारांची परंपरा जपली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष योगेश गायकवाड हे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेली देशभक्तीपर भाषणे, समूहगीत व निवडक नृत्याविष्कारांनी उपस्थितांची मने जिंकली. लहानग्यांच्या सादरीकरणाने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दुमदुमून गेला होता.

या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष स्वाती गवळी, माजी सरपंच विलासनाना काळे, माजी ग्रामपंचायत सदस्य बापूराव काळे, ग्रामविकास अधिकारी शेजाळ भाऊसाहेब यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक ज्ञानदेव सुद्रिक यांनी केले. सूत्रसंचालन मधुकर गदादे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रवीण शहाणे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक मोटे सर, पानसरे सर, श्रीमती खरात मॅडम व श्रीमती शेजाळ मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले.




