एकल महिलांचा हळदी कुंकू तिळगुळ, वाण देऊन सन्मान सोहळा संपन्न


कर्जत (प्रतिनिधी) :- साऊ एकल महिला समिती कर्जत, तेजस्विनी मंच व चंदुकाका सराफ बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने मकरसंक्रांतीनिमित्त हळदी कुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयामध्ये संपन्न झाला. या कार्यक्रमाला चंदुकाका सराफ बारामती शाखा व्यवस्थापक गजेंद्र पालीवाल, साऊ एकल महिलाच्या कर्जत अध्यक्षा उज्ज्वला शेळके उपस्थित होत्या. त्यांनी एकल महिलांसाठी करत असलेल्या कामांचा लेखाजोगा मांडला. तसेच तालुक्यातील एकल भगिनींना आपले प्रश्न सोडविण्यासाठी साऊ एकल समिती ला जॉईन होण्याचे आवाहन करण्यात आले.अध्यक्षस्थानी दादा पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. संजय नगरकर हे होते.

या कार्यक्रमामध्ये आदर्श माता सन्मान निर्मलाताई घुले यांना देण्यात आला. तसेच पुनर्विवाह केलेल्या कीर्ती गणेश शेलार यांचा सन्मान करण्यात आला. तसेच मकरसंक्रांतीनिमित्त हळदी कुंकू व होम मिनिस्टर कार्यक्रमनिमित्त उपस्थित सर्व एकल महिलांचा सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर व नगराध्यक्षा रोहिणीताई घुले यांच्या हस्ते करण्यात आला. यानिमित्त बालहत्या प्रतिबंध संदर्भात शपथ देण्यात आली. उपस्थित सर्व महिलांना चंदुकाका सराफ, बारामती यांच्याकडून मकरसंक्रांतीनिमित्त वाण भेट म्हणून देण्यात आला.

याप्रसंगी कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा रोहिणीताई घुले, जयश्री कुलथे, लंका पठाडे, जयश्री धांडे, स्वाती पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली. या एकल महिलांमधून श्रीमती लंका श्रीराम पठाडे यांनी आपल्या जीवनाची संघर्ष कहाणी कथन केली. विधवापण काय असतं आणि विधवपन कसे भोगत आले आहे याची कहाणी त्यांनी उपस्थितांना सांगितली. जयश्री कुलथे यांनी दादा पाटील कॉलेज उपक्रमशील असल्याचे सांगितले. विधवांना घरापासूनच संघर्ष करावा लागतो. स्वतःला अबला न समजता सक्षम समजावे असा सल्ला दिला.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये सांगितले की, विधवा महिलांच्या जीवनाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन अजूनही बदललेला नसल्याचे सांगितले. परिस्थितीतून धाडस निर्माण होते. निसर्गाने जगात सर्वात सुंदर निर्माण केलेली वस्तू म्हणजे स्त्री आहे. तिचा सन्मान केला पाहिजे. याप्रसंगी त्यांनी आपल्या आईची संघर्षकहाणी उपस्थितांसमोर विशद करून एकल महिलांनी संघर्षाला सामोरे जाण्याचे आवाहन उपस्थितांसमोर व्यक्त केले.

संवादक दिपकनाना बारामतीकर यांच्या नेतृत्वाखाली ‘खेळ पैठणीचा’ हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमामध्ये सर्व एकल महिला यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला, प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाला आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
या कार्यक्रमाला २४७ एकल महिला, १३६ प्राध्यापिका व कर्जत तालुक्यातील महिला व ७०० महाविद्यालयीन विद्यार्थिनी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. माधुरी गुळवे, सूत्रसंचालन स्वाती पाटील, प्रा. स्वप्निल म्हस्के यांनी तर आभार प्रा. मीना खेतमाळीस यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तेजस्विनी मंच, एकल महिला समिती कर्जतच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले



