pub-1628281367759110
Advertisement
ब्रेकिंग

धक्कादायक! कर्जतच्या शाळेत पिसाळलेल्या कुत्र्याचा हल्ला | चिमुकल्यांसह १३ जखमी

Samrudhakarjat
4 6 0 0 8 4

कर्जत | प्रतिनिधी : – कर्जत शहरासह तालुक्यातील दुरगाव परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत शाळकरी मुले, महिला, पालक आणि चिमुकल्या बालकांसह तब्बल १३ जणांना चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे कर्जत तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

कर्जत शहरातील डायनामिक इंग्लिश स्कूल येथे खेळाच्या तासात ही घटना घडली. मैदानावर विद्यार्थ्यांचा गोळाफेकीचा सराव सुरू असताना पिसाळलेला कुत्रा अचानक शाळेच्या आवारात घुसला. त्याने सर्वप्रथम शेजल विशाल दळवी (वय ९) या विद्यार्थिनीला पाठीमागून चावा घेतला. त्यानंतर गोंधळ उडाल्यानंतर कुत्र्याला हुसकावण्यासाठी धावलेल्या इतर विद्यार्थ्यांवरही त्याने हल्ला केला…

या हल्ल्यात सोहम प्रमोद परदेशी (१३), आदित्य तात्याराम सुद्रिक (१४) आणि संग्राम धनाजी जायभाई (१४) हे विद्यार्थी जखमी झाले. गोंधळाच्या परिस्थितीत पराजक्ता प्रमोद पठाडे (२२) या शिक्षिकेलाही कुत्र्याने चावा घेतला. तसेच मुलांना शाळेतून नेण्यासाठी आलेले अनिल बापूराव सोनवणे (३८, कोळवडी), अविनाश तुळसीदास काळोखे (४५), मोहसीन आझाद शेख (४०) आणि सागर विलास लंगुटे (३४) यांनाही कुत्र्याच्या हल्ल्याला सामोरे जावे लागले.

दरम्यान, याच पिसाळलेल्या कुत्र्याने दुरगाव परिसरातही दहशत माजवली. अंगणात खेळत असलेल्या समीक्षा गोविंद वाघमारे (दीड वर्ष) आणि अजय बबन काटकर (३ वर्षे) या दोन चिमुकल्या बालकांवर अचानक हल्ला करून त्यांनाही चावा घेतला. तसेच प्रशांत जगधने (२४, मुळेवाडी) आणि शिवन्या शिंदे (९) हे देखील या हल्ल्यात जखमी झाले आहेत.

सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयातील डॉक्टर हांगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व जखमींवर आवश्यक उपचार सुरू असून रेबीज प्रतिबंधक लस व औषधोपचार देण्यात आले आहेत. सुदैवाने सर्व जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले.

या घटनेनंतर कर्जत आणि दुरगाव परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहर व ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असताना संबंधित प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. शाळेच्या आवारात आणि चिमुकल्या मुलांवर घडलेला हा हल्ला अतिशय गंभीर असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker