चि. आदर्श विशाल मेहेत्रे याचे शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश
राज्य गुणवत्ता यादीत निवड; कर्जत तालुक्यात प्रथम क्रमांक


कर्जत : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (PSE) इयत्ता ४ थी – २०२६ परीक्षेत कर्जत येथील शरदचंद्र पवार इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी चि. आदर्श विशाल मेहेत्रे याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

आदर्श याने परीक्षेत ३०० पैकी २५८ गुण (८६ टक्के) मिळवत राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळविले असून, मेरीट लिस्टमध्ये ४ था क्रमांक पटकावला आहे. त्याने कर्जत तालुक्यात प्रथम क्रमांक, अहिल्यानगर जिल्ह्यात ४ था क्रमांक आणि महाराष्ट्र राज्यात १५ वा क्रमांक मिळवून कर्जतच्या शैक्षणिक क्षेत्राची मान उंचावली आहे.
कर्जतमधील सुप्रसिद्ध व्यावसायिक तथा सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे श्री. विशाल मेहेत्रे सर यांचे चिरंजीव असलेल्या आदर्शने मिळविलेल्या या यशाबद्दल कुटुंबीय, शिक्षक, शाळा व्यवस्थापन, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्याचे अभिनंदन होत आहे.

आदर्शच्या या यशामागे अभ्यासातील सातत्य, मेहनत, जिद्द आणि शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन असल्याचे सांगण्यात येत आहे. लहान वयातच शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत स्थान मिळवून आदर्शने आपल्या बुद्धिमत्तेची व मेहनतीची चमक दाखवून दिली आहे.
आदर्शच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छा व्यक्त होत आहेत. भविष्यातही त्याने अशाच प्रकारे उत्तुंग यश संपादन करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



