गोदड महाराजांच्या ओटीतून मदतीचा हात; वैभव थोरात यांच्या उपचारासाठी ट्रस्टकडून २० हजारांची मदत


कर्जत | प्रतिनिधी : – कर्जत म्हणजे ‘धाकटी पंढरी’… इथं संतांची परंपरा आहे, भक्तीचा गजर आहे आणि त्याचबरोबर संकटात माणसाच्या मदतीला धावून जाण्याची माणुसकीची परंपराही आहे. याच परंपरेचा प्रत्यय पुन्हा एकदा श्री संत सद्गुरू गोदड महाराज ट्रस्टच्या वतीने देण्यात आला. श्री गोदड महाराजांच्या रथाची ओटी लागताना दुखापत झालेल्या वैभव मनोज थोरात यांच्या उपचारासाठी ट्रस्टने २० हजार रुपयांची आर्थिक मदत केली.

श्री गोदड महाराजांच्या रथोत्सवाच्या धार्मिक परंपरेत ओटीला विशेष महत्त्व आहे. याच ओटीची मानकरी असलेल्या मनोज़ विठ्ठल थोरात यांच्या चिरंजीव वैभव थोरात यांना रथाची ओटी लागताना दुखापत झाली. दुखापतीनंतर त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून, दवाखान्याचा खर्चही कुटुंबासमोर उभा राहिला. अशा वेळी ‘देवाच्या दारी आलेल्या माणसाला अडचणीत सोडायचं नाही’, या भावनेतून गोदड महाराज ट्रस्टने मदतीचा हात पुढे केला.

ट्रस्टच्या वतीने २० हजार रुपयांचा धनादेश देऊन वैभव यांच्या उपचारासाठी आर्थिक हातभार लावण्यात आला. त्यामुळे अडचणीच्या काळात थोरात कुटुंबाला मोठा आधार मिळाला आहे.
यावेळी श्री गोदड महाराजांचे पुजारी पंढरी महाराज काकडे, ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप अण्णा पाटील, सचिव शशिकांत दादा पाटील, ट्रस्टचे खजिनदार विभीषण खोसे, ट्रस्टी तानाजी पाटील सर, अन्नछत्र मंडळाचे ट्रस्टी व ओटीचे मानकरी सोमनाथ थोरात, मानकरी मोहन विठ्ठल थोरात, महाराजांचे सेवेकरी तसेच रोहित भैया शिंदे व भक्तमंडळी उपस्थित होते.
देवाच्या सेवेसोबत माणसाचीही सेवा!
गोदड महाराजांच्या चरणी श्रद्धा ठेवून येणाऱ्या भाविकांसाठी ट्रस्टच्या माध्यमातून विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबवले जातात. मात्र, एखाद्या भाविकाच्या अडचणीच्या काळात त्याच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी सेवा असल्याचे या मदतीतून दिसून आले.
रक्कम २० हजारांची असली तरी त्यामागची भावना मोठी आहे. कारण संकटाच्या वेळी मदतीचा हात पुढे आला की, त्या हाताची किंमत पैशांत मोजता येत नाही. थोरात कुटुंबाच्या अडचणीच्या काळात गोदड महाराज ट्रस्टने दिलेला हा आधार परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.
‘महाराजांच्या सेवेत भक्ती आणि भक्तांच्या सेवेत माणुसकी’ अशीच गोदड महाराजांच्या भूमीची ओळख अधिक घट्ट करणारा हा उपक्रम ठरला आहे.



