कर्जत तालुक्यातील हॉटेल बासरीवर पोलिसांचा धाडसी छापा!
अवैध वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश; चालकाविरुद्ध गुन्हा, पीडित महिलेची सुटका


कर्जत | प्रतिनिधी :- कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राशीन-भिगवण रोडवरील हॉटेल बासरी येथे सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर कर्जत पोलिसांनी रविवारी रात्री धडक कारवाई करत व्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत हॉटेल चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे.
पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड यांना हॉटेल बासरीमधील लॉजवर अवैध वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून सापळा रचला. माहिती खरी असल्याचे स्पष्ट होताच रविवारी रात्री सुमारे ९ वाजता पोलिसांनी लॉजवर छापा टाकला.

या कारवाईदरम्यान हॉटेल चालक अक्षय शुभम रामभाऊजी बोडखे (रा. राशीन, ता. कर्जत) हा एका महिलेला पैशांचे आमिष दाखवून तिच्याकडून देहविक्री करून घेत असल्याचे उघड झाले. तसेच या व्यवसायासाठी लॉजची खोली उपलब्ध करून दिल्याचेही तपासात समोर आले.
याप्रकरणी पोलीस शिपाई प्रकाश दंडाडे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. २९२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १४३ तसेच स्त्री व मुली अनैतिक प्रतिबंध अधिनियम १९५६ मधील कलम ३, ४, ५ व ७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या पीडित महिलेची माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार सुटका करण्यात आली.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक रमीझ मुलाणी, पोउपनि बाळासाहेब मुळीक, अमोल रायकर, विशाल क्षीरसागर, किरण बोराडे, प्रकाश दंडाडे, सचिन बर्डे, दिपाली भंडलकर तसेच मोबाईल सेल अहिल्यानगरचे राहुल गुंडू यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली. पुढील तपास पोउपनि बाळासाहेब मुळीक करीत आहेत.

पोलिसांचे आवाहन
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुठेही अशा प्रकारचे अवैध व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ कर्जत पोलीस स्टेशनच्या ०२४८९-२२२३३३ या दूरध्वनी क्रमांकावर किंवा डायल ११२ वर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
