राशीन व परिसरातील मतदारांनी २९ जुलैपूर्वी कागदपत्रे जमा करण्याचे तहसीलदार रवी सतवन यांचे आवाहन


राशीन (प्रतिनिधी – जावेद काझी): – भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राशीन शहर व परिसरामध्ये दि. ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत ‘विशेष सखोल पुनर्नरीक्षण’ (SIR) कार्यक्रम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर, नुकतीच प्रशासकीय अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या मोहिमेदरम्यान फॉर्म भरताना येणाऱ्या त्रुटी, अडचणी तसेच मयत व दुबार मतदारांचे अर्ज कसे भरावेत, याबद्दल माननीय तहसीलदार रवी सतवन यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले व आवश्यक माहिती दिली.

या विशेष मोहिमेअंतर्गत गावातील प्रत्येक मतदाराचे दोन महत्त्वाचे फॉर्म भरून घेतले जाणार आहेत. यासाठी राशीन गावांमधील प्रत्येक वार्डातील बी.एल.ओ. (BLO) आणि आशा सेविका घरोघरी जाऊन कार्यरत झाल्या आहेत. नागरिकांनी कोणत्याही त्रुटी किंवा अडचणी टाळण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे आणि वेळेत आपले फॉर्म भरून द्यावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मतदार यादीतील नाव निश्चित करण्यासाठी प्रत्येक कुटुंबप्रमुखाने आपल्या घरातील सर्व पात्र सदस्यांची खालील कागदपत्रे तातडीने तयार ठेवून संबंधित बी.एल.ओ. यांच्याकडे जमा करणे बंधनकारक आहे

१) दोन रंगीत (कलर) फोटो
२) आधार कार्ड झेरॉक्स (नोंद: गोपनियतेसाठी आधार क्रमांक योग्य प्रकारे हाताळला जाईल)
३) मतदान कार्ड झेरॉक्स
सर्व मतदारांनी याची गंभीर दखल घ्यावी की, जर ही आवश्यक कागदपत्रे विहित मुदतीत म्हणजे २९ जुलै २०२६ पर्यंत जमा केली नाहीत, तर संबंधित मतदाराचे नाव मतदार यादीतून नियमानुसार कमी (वगळले) करण्यात येईल…

या महत्त्वपूर्ण बैठकीला माननीय तहसीलदार श्री. रवी सतवन यांच्यासह नायब तहसीलदार योगेश जाधव, मंडलाधिकारी विश्वास राठोड, तलाठी सुपेकर, निवडणूक डेटा ऑपरेटर प्रवीण तापकीर, तसेच प्रदीप कोकाटे, भास्कर घोडके, राजीव राठोड, विनोद आढाव, सचिन साळुंके, आजिनाथ सानप, भगवान शिंदे, संतोष मुसळे, रावसाहेब ढवळे, प्रशांत जाधव आणि सर्व सहाय्यक आशा सेविका व बी.एल.ओ. उपस्थित होते.
तरी राशीन व परिसरातील सर्व नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात वेळेत आपली कागदपत्रे जमा करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



