दुसऱ्या स्त्रीशिक्षिका साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी छाया कोरेगावकर यांची निवड

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत येथील रयत शिक्षण संस्थेच्या ‘ दादा पाटील महाविद्यालया’त बुधवार दि. ३ जानेवारी २०२४ रोजी मराठी विभागाने आयोजित केलेल्या ‘ दुसऱ्या स्त्रीशिक्षिका साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदी कोरेगाव, जि. सातारा येथील ‘छाया कोरेगावकर’ यांची निवड करण्यात आल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष राजेंद्रतात्या फाळकेे व प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी दिली आहे.
स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ३ जानेवारी रोजी दादा पाटील महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने स्त्रीशिक्षिका साहित्य संमेलनाचे आयोजन केले जात आहे. संमेलनाचे हे दुसरे वर्ष आहे.
संमेलनाध्यक्ष छाया कोरेगावकर यांचे आजपर्यंत ‘आकांत प्रिय माझा’, ‘एक अवकाश माझंही’ हे दोन काव्यसंग्रह, ‘रिक्त-विरक्त’ कादंबरी प्रकाशित झाली असून तर ‘न विझलेल्या चुली’ हा कथासंग्रह व एक काव्यसंग्रह प्रकाशनाच्या मार्गावर आहे. याव्यतिरिक्त ललित, स्फूटलेखन, वैचारिक लेखनही त्यांनी केलेले आहे.
महिला सक्षमीकरणासाठी सक्रिय सहभाग घेऊन त्यांनी महिला बचतगटांना मार्गदर्शन, महिला मेळावे घेऊन आत्मभान जागृतीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. १९८० पासून विवेकानंद केंद्र, सानेगुरुजी कथामाला, राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून समाजप्रबोधन कार्यात त्या सक्रिय आहेत. तसेच नवोदित साहित्यिकांना मार्गदर्शन, महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर फुले, शाहू, आंबेडकर यांच्या वैचारिक प्रसारासाठी व्याख्याने देणे सुरू आहे. ‘बाई उलगडताना..प्रवास आत्मभानाचा’ हा एक तासांचा स्वरचित कवितांच्या सादरीकरणाचा त्यांचा कार्यक्रम त्या करतात. त्याचबरोबर दूरदर्शन व आकाशवाणीवरून कविता सादरीकरणाचे अनेक कार्यक्रम त्यांनी केले आहेत. पहिल्या स्त्री शिक्षिका साहित्य समेलनाच्या अध्यक्षा डॉ. प्रतिभा अहिरे यांच्याकडून दि.३ जानेवारी रोजी छाया कोरेगावकर समेलन अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील अशी माहिती आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी दिली.