कर्जत येथे आजी-माजी सैनिक संघटनेतर्फे कारगिल विजय दिवस साजरा

कर्जत (प्रतिनिधी) :- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून कर्जत येथील जय जवान आजी-माजी सैनिक सेवा फाऊंडेशनच्यावतीने बुधवारी सकाळी कर्जत-वालवड रोडला शंभर झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले त्यानंतर हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली.
२६ जुलै १९९९ रोजी भारताने पाकिस्तानवर कारगिल युद्धात विजय मिळवला होता. ६० दिवस चाललेल्या या युद्धात भारतीय जवानांनी आपल्या प्राणाची बाजी लावत पाकिस्तानी सैन्याला धूळ चारत २६ जुलै रोजी विजयी झेंडा फडकविला होता. त्या दिवसापासून भारतात हा दिवस कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
बुधवारी २४ वा कारगिल विजय दिवस जय जवान आजी-माजी सैनिक सेवा फाऊंडेशन, सर्व सामाजिक संघटना आणि कर्जत नगरपंचायतच्यावतीने शहरातील कर्जत-वालवड रोडला १०० झाडांचे वृक्षारोपण करून हुतात्मा स्मारकास अभिवादन करीत युद्धात शहिद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली. यावेळी अनेक जवानांनी आपल्या शौर्याची आठवण उपस्थितांना करून दिली. त्यावेळी नगराध्यक्षा उषाताई राऊत , सभापती भाऊसाहेब तोरडमल, नगरसेविका प्रतिभाताई भैलुमे, डी.वाय.एस.पी. विवेक वाखारे,आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब रानमाळ, सुनील साळुंखे, श्रीकांत मारकड,सत्यवान शिंदे,रामदास फरांडे, अरुण माने, राजू तोरडमल,हरिश्चंद्र खोसे, सुधीर रानमाळ,गंगाराम बनसोडे, सुधीर करपे, भाऊसाहेब आगवन, संपत बीटके, बाळासाहेब पवार, संजय पठारे, गणपत ढेरे इत्यादी माजी सैनिक व सर्व सामाजिक संघटनांचे शिलेदार उपस्थित होते.