“‘एक पेड माँ के नाम’ — सचिन पोटरे यांच्या वाढदिवशी हरित उपक्रमाने कर्जत सजले”

(समृद्ध कर्जत) :- कर्जत, ७ जून २०२५ — पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारला ११ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर “संकल्प ते सिद्धीपर्यंत” या संकल्पनेवर आधारित विविध जनसंपर्क व विकासाभिमुख उपक्रम देशभरात राबवले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून “एक पेड माँ के नाम” या पंतप्रधानांच्या प्रेरणादायी संकल्पनेवर आधारित अभिनव वृक्षारोपण उपक्रमाचे आयोजन कर्जत शहरात करण्यात आले.
भाजपा जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांच्या वाढदिवसानिमित्त ७ जून रोजी सकाळी ६.३० ते ७.३० या वेळेत प्रबोधनकार क्रीडा व सांस्कृतिक ग्रामीण सेवाभावी प्रतिष्ठान कर्जत आणि शहरातील विविध सर्व सामाजिक संघटनांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला.
या उपक्रमांतर्गत कर्जत शहरात सुमारे दीड लाख वृक्षांची लागवड करण्यात येत असून, शहराला हरित व स्वच्छ बनवण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे. विशेष म्हणजे, हे वृक्षारोपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, केंद्रीय पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा कार्याध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे तसेच आमदार शिवाजीराव कर्डीले, मोनिकाताई राजळे आणि विक्रमसिंह पाचपुते यांच्या मातोश्रींच्या नावे करण्यात आले.
या अनोख्या उपक्रमाला विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. नगराध्यक्ष रोहिणी घुले, उपनगराध्यक्ष संतोष म्हेत्रे, तसेच अनिल गदादे, विनोद दळवी, सुनील शेलार, रवींद्र सुपेकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
पर्यावरण संवर्धनासाठी नागरिकांचा सक्रीय सहभाग अत्यंत आवश्यक आहे, असे आवाहन सचिन पोटरे यांच्या वतीने करण्यात आले. वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम शहरवासीयांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळवत आहे.