राशीन उपबाजार समितीच्या व्यापारी संकुलाचा शुभारंभ सभापती राम शिंदे यांच्या हस्ते

कर्जत प्रतिनिधी :- राशीनच्या आई जगदंबेच्या पावन भूमीत गेल्या ३५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या उपबाजार समितीच्या विकासकामांचा प्रश्न मार्गी लागण्याच्या प्रक्रियेत मला उपसभापती पदाच्या रूपाने काम करण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो, असे प्रतिपादन कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान उपसभापती अभय (आबासाहेब) पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.
पाडव्याच्या शुभमुहूर्तावर, म्हणजेच येत्या ३० मार्च २०२५ रोजी, कर्जत-जामखेडचे भाग्यविधाते आणि महाराष्ट्र राज्य विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या शुभहस्ते, तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, राशीन उपबाजार समितीच्या नवीन व्यापारी संकुलाचा शुभारंभ होणार आहे.
यासंदर्भात माहिती देताना उपसभापती आबासाहेब पाटील म्हणाले, “कर्जत-जामखेडचे भाग्यविधाते सभापती राम शिंदे यांनी तालुक्यात नेहमीच विकासाची गंगा आणण्याचे काम केले आहे. त्याच विकासात्मक दृष्टीकोनातून बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी, व्यापारी, हमाल, मापाडी, कामगार आणि सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी सातत्याने कार्य केले जात आहे.
या विकासाच्या वाटचालीतील एक महत्त्वाचे पाऊल म्हणजे राशीन उपबाजार समितीच्या व्यापारी संकुलाची उभारणी, जी शहराच्या विकासाचा चेहरामोहरा बदलून टाकणार आहे. कर्जत तालुका बाजार समितीची स्थापना जुनी असली, तरी ती तालुक्याच्या विकासाचा केंद्रबिंदू राहिली आहे. आज पुन्हा एकदा सभापती राम शिंदे यांच्या सहकार्याने आणि विकासनशील दृष्टीकोनातून या बाजार समितीच्या माध्यमातून विकासाची गंगा निरंतर वाहती ठेवण्यासाठी सभापती काकासाहेब तापकीर, संचालक मंडळ, व्यापारी, माथाडी कामगार आणि कर्मचारी सातत्याने प्रयत्नशील आहेत व पुढेही राहतील,” असे त्यांनी सांगितले.
रविवार, ३० मार्च २०२५ रोजी, गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उपसभापती अभय (आबासाहेब) पाटील यांनी केले आहे.
कर्जत तालुका बाजार समितीमध्ये सर्वसमावेशक पद्धतीने कामकाज चालते, आणि त्यासाठी सभापती राम शिंदे यांचे मार्गदर्शन कायम लाभत आहे. त्यामुळेच गेली ३५ वर्षे प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर तोडगा काढता आला आणि विकासात्मक भूमिका बजावता आली, याचा आनंद असल्याचे त्यांनी सांगितले.
स्थानिक प्रश्न सोडवताना ज्येष्ठ नेते अंबादास पिसाळ यांचे सहकार्य, तसेच विरोधी पक्षात असूनही राजेंद्र तात्या फाळके यांची मोलाची साथ मिळते, याबद्दल त्यांनी आभार मानले.
“लोकाभिमुख उपसभापती म्हणून कार्य करताना ‘सबका साथ, सबका प्रयास, सबका विकास’ या त्रिसूत्रीवर काम करण्याचा आमचा मानस आहे. येत्या काळात सर्वपक्षीय, सर्वसमावेशक आणि लोकहितकारी काम करणारी कर्जत तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती ही राज्यातील एकमेव बाजार समिती असेल,” असे गौरवोद्गार उपसभापती अभय (आबासाहेब) पाटील यांनी काढले.