कर्जतचे नवे तहसीलदार रवी सतवन रुजले; नगराध्यक्षा व पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा…


कर्जत (प्रतिनिधी) — कर्जत तालुक्याचे नूतन तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी रवी सतवन यांनी रुजू झाल्यानंतर १९/११/२०२५ रोजी तहसील कार्यालयात कर्जत शहराच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. शहरातील पदाधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. रवी सतवन हे शांत, अभ्यासू व लोकाभिमुख अधिकारी म्हणून ओळखले जात असल्याने त्यांच्या नियुक्तीमुळे कर्जत तालुक्याच्या विकासकामांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी घुले बांधकाम समिती सभापती भास्कर भैलुमे, नगरसेवक भाऊसाहेब तोरडमल, नगरसेवक रवींद्र सुपेकर, भाजप कर्जत शहराध्यक्ष अमोल भगत तसेच ओंकार खराडे सचिन शिंदे उपस्थित होते. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांशी शहरातील प्रलंबित विषय, नागरिकांच्या अडचणी आणि विविध शासकीय योजनांचे लाभ प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचावेत यावर चर्चा केली.

नूतन तहसीलदार रवी सतवन यांनी सर्वांचे स्वागत मान्य करून कर्जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाकडून पूर्ण तत्परता दर्शविण्याचे आश्वासन दिले. कर्जत शहरातील नागरिक तसेच लोकप्रतिनिधींमध्ये त्यांच्या रुजूवातीमुळे सकारात्मकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.




