कर्जत तालुक्याला नवा दिशा: नूतन तहसीलदार रवी सतवन यांचे भाजपच्या वतीने भव्य स्वागत


(समृध्द कर्जत प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यात आज प्रशासनिक बदलाचा ऐतिहासिक क्षण साकारला. नव्या उत्साहाने व कार्यक्षम विचारसरणीने पदभार स्वीकारणारे नूतन तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी श्री. रवी सतवन यांचे भाजप पदाधिकाऱ्यांच्या वतीने जोरदार स्वागत व सत्कार करण्यात आला. तहसील कार्यालय परिसर कार्यकर्त्यांच्या उत्साहाने अक्षरशः दुमदुमून गेला होता.
या स्वागत समारंभाला भाजपचे अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. त्यामध्ये संघटन जिल्हा सरचिटणीस शेखर खरमरे, भटक्या मुक्त प्रमुख गणेश पालवे, गणेश शिरसागर, यशराज बोरा, स्वप्निल तोडमल, धनंजय आगम, दत्ता मुळे, उमेश जपे, रुद्रा भिसे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.

सत्कारानंतर झालेल्या बैठकीत सर्वात महत्त्वाचा मुद्दा मांडण्यात आला — अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या अनुदानाचा. कर्जत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी पंचनामे व तांत्रिक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरही अनुदानापासून वंचित राहत असल्याची गंभीर बाब संघटन जिल्हा सरचिटणीस शेखर खरमरे, यांनी तहसील प्रशासनासमोर मांडली.
अनेकांना योग्य माहिती न मिळाल्याने कागदपत्रांची पूर्तता अपुरी राहते, तर पूर्ण झालेले पंचनामे वेळेत अपलोड न होणे किंवा तांत्रिक त्रुटींमुळे फाईल प्रलंबित राहते, अशी वस्तुस्थितीही यावेळी अधोरेखित करण्यात आली. शेतकऱ्यांना गोंधळातून मार्ग काढून योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी तहसील स्तरावर स्वतंत्र, तातडीचा हेल्प डेस्क / तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्याची मागणी करण्यात आली.

संघटन जिल्हा सरचिटणीस शेखर खरमरे यांनी सभापती प्रा. राम शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार शेतकरीहिताचे ठोस मुद्दे मांडताना, प्रत्येक पात्र शेतकऱ्याला अनुदान मिळालेच पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडली. शेतकऱ्यांच्या तक्रारी तातडीने सोडवून, प्रक्रियेत पारदर्शकता राखून प्रशासनाने जलद गतीने कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली.
या सर्व मुद्यांना गांभीर्याने प्रतिसाद देत नूतन तहसीलदार रवी सतवन यांनी प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असल्याचे स्पष्ट केले.
“शेतकऱ्यांच्या तक्रारी त्वरित सोडवण्यासाठी तहसील प्रशासन सज्ज आहे. नागरिकाभिमुख पद्धतीने कामकाज सुधारण्यास आम्ही कटिबद्ध आहोत,” असे आश्वासन त्यांनी दिले.

नूतन तहसीलदारांच्या सकारात्मक भूमिकेमुळे आणि संघटन जिल्हा सरचिटणीस शेखर खरमरे, मांडलेल्या ठोस मागण्यांमुळे कर्जत तालुक्यात प्रशासनिक कामकाजात बदलाची नवी हवा निर्माण झाली आहे. शेतकरी अनुदानाचा प्रश्न मार्गी लागण्याबाबत नागरिकांनी प्रशासनाकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.



