आता लक्ष सुवर्णपदकावर : पै. हर्षदा मासाळ, प्रभातनगर येथे लाडक्या लेकीचा ग्रामस्थांकडून भव्य सत्कार


कर्जत : “कुस्ती स्पर्धेत आतापर्यंत अनेक पराभव पाहिले, त्यातून शिकत अखेर कांस्यपदक जिंकण्यात यश मिळवले आहे. मात्र आता माझे लक्ष्य सुवर्णपदक जिंकण्याचे आहे,” असा आत्मविश्वास शालेय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक विजेती खेळाडू हर्षदा मासाळ हिने व्यक्त केला.
कर्जत शहरातील प्रभातनगर येथे आयोजित सत्कार समारंभात ती बोलत होती. अध्यक्षस्थानी माजी तालुका विकास अधिकारी युवराज तनपुरे होते.

डोंबाळवाडी येथील मुळची रहिवासी असलेल्या हर्षदा मासाळ हिने न्यू इंग्लिश स्कूल, आंबीजळगाव विद्यालयाच्या वतीने शालेय कुस्ती स्पर्धेत चमकदार कामगिरी केली आहे. १९ वर्ष वयोगटात व ५५ किलो वजनगटात खेळताना हर्षदाने तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर प्रथम क्रमांक पटकावला.
राज्याचे प्रतिनिधित्व करताना हरियाणातील पानीपत येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक मिळवून हिने कर्जत तालुक्याचा गौरव वाढविला.

कुस्तीपटू हर्षदा मासाळ हिचा प्रभातनगर रहिवाशांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. “प्रभातनगरच्या शेजाऱ्यांनी मला दिलेल्या शाबासकीमुळे आत्मविश्वास दुणावला आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे आणि प्रेरणेमुळे आगामी स्पर्धेत निश्चितच सुवर्णपदक जिंकून दाखवेन,” असे हर्षदाने सांगितले.
या कार्यक्रमाला लिंबदेव ग्रुपचे अध्यक्ष संजय शिंदे, केमिस्ट अण्णासाहेब जगताप, मुख्याध्यापक ईश्वर सोलनकर, डॉ. सचिन आटोळे, मेजर संजय हिरडे, धनाजी निकम, रामनाथ होंडे, कृषी अधिकारी अण्णासाहेब थोरात, मुख्याध्यापक विलास सोमवंशी, उपप्राचार्य राजाराम कानडे, संतोष गलांडे, मुख्याध्यापक वसुदेव बडे, क्रीडा शिक्षक अण्णासाहेब मासाळ, तसेच मच्छिद्र अनारसे आणि मायडू चौधरी उपस्थित होते.

🟦 : हर्षदाचे लक्ष्य सुवर्णपदकावर
“माझे वडील क्रीडा शिक्षक आहेत. कुस्ती क्षेत्रात मी नाव कमवावे, अशी आई-वडिलांची इच्छा आहे. त्या दृष्टीने मी सध्या कसून सराव करत असून, शालेय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवून त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करणार आहे.”
– हर्षदा मासाळ, कुस्तीपटू, कर्जत




