चापडगावच्या रत्नाची बॉलीवूडमध्ये तेजस्वी लखलख


बॉलीवूडचा स्टार अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला ‘De De Pyaar De 2’ हा सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाच्या निर्मितीत चापडगावचा मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा सहभाग आहे, हे सांगताना आम्हाला अपार अभिमान वाटतो. अजय देवगणच्या या संपूर्ण सिनेमाचे *कला दिग्दर्शन (Art Direction) चापडगावचा रत्न युवराज सुभाष लांडगे याने सांभाळले आहे.
युवराज सुभाष लांडगे… चापडगावचा एक साधा, शांत, पण कर्तृत्वाने तुफान तेजस्वी असा युवक. अत्यंत कमी वयात त्याने बॉलीवूडमध्ये केलेली कामगिरी अभिमानाने डोळे दिपवणारी आहे. साधारणपणे बॉलीवूडमध्ये ‘कला दिग्दर्शन’ सारख्या जबाबदारीच्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी आयुष्याचा मोठा काळ खर्ची पडतो. काहींना तर आयुष्यभर प्रयत्न करूनही ही संधी मिळत नाही. पण युवराजने मेहनत, जिद्द आणि कलेची आस ही तिन्ही शस्त्रे हातात घेऊन कमी वयातच अशक्य वाटणारी जादू करून दाखवली आहे.
चापडगावच्या मातीत आकाशाला गवसणी घालणारी ताकद आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विविध क्षेत्रांत चापडगावची मुले-मुली सातत्याने ठसा उमटवत आहेत. अशा हिऱ्यांपैकी एक उज्ज्वल हिरा म्हणजे युवराज सुभाष लांडगे.
युवराजने १० वीपर्यंतचे शिक्षण चापडगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये घेतले. त्यानंतर १२ वीचे शिक्षण कर्जत येथे पूर्ण करून, आपल्या आवडीच्या कलेच्या क्षेत्रात त्याने पुण्यातील अभिनव कला महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि नंतर मुंबईतील नामांकित *जे.जे. स्कूल ऑफ आर्ट* येथे कलेचे उच्च शिक्षण घेतले. शैक्षणिक पायाभरणीतून कलेची समज, सौंदर्यदृष्टी आणि प्रगल्भता त्याने विकसित केली आणि तेच आज त्याच्या यशाचे भक्कम आधारस्तंभ ठरले आहे.

*कला दिग्दर्शन म्हणजे काय?*
चित्रपटातील प्रत्येक दृश्य, प्रत्येक सेट, वातावरण, रंगसंगती, जागेची रचना, पात्राभोवतीचा परिसर हे सर्व प्रेक्षकांवर खोल प्रभाव टाकणारे घटक ‘कला दिग्दर्शन’ ठरवते. दिग्दर्शकाची कल्पना प्रत्यक्ष सेटवर उतरवण्याचे काम कला दिग्दर्शक करतो. प्रेक्षकांच्या नजरेत पडणारे बहुतेक सर्व दृश्यात्मक सौंदर्य इंटिरिअर, एक्सटिरिअर, प्रॉप्स, कालखंडानुसार तयार केलेले वातावरण या सर्वामध्ये कला दिग्दर्शकाची प्रतिभा दडलेली असते.
म्हणजेच, *एखादा सिनेमा ‘दिसतो’ तसा सुंदर आणि भव्य वाटण्यामागे सर्वात मोठा हात कला दिग्दर्शकाचा (Art Director) असतो.*

चापडगावच्या एका तरुणाने बॉलीवूडसारख्या मोठ्या इंडस्ट्रीत जाऊन अल्पावधीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अजय देवगणसारख्या गुणी आणि दिग्गज अभिनेत्यासोबत त्याला या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली हे केवळ युवराजचे यश नाही; तर ते चापडगावच्या प्रत्येकाच्या स्वप्नांना, आशांना आणि कर्तृत्वाला जोडणारी सामूहिक भरारी आहे. महत्वाचे म्हणजे या सिनेमाचे शूटिंग पंजाब आणि लंडन मध्ये झालेले आहे.
कला क्षेत्राबद्दल आपल्या समाजात अजूनही अनेक गैरसमज आहेत.
“नुसती चित्रं काढून काय होतं?”, “यातून काय करिअर बनतं?”* अशा उपरोधिक टोमण्यांना तोंड देतच अनेक मुलांची कला मरते.
पण युवराजने सिद्ध केले आहे की—
योग्य मार्गदर्शन, सातत्य आणि ध्यास असेल तर चित्रकलेतही अफाट संधी आहेत आणि मोठी भरारीही घेता येते.

चापडगाव आणि एकूणच कर्जत तालुक्यातील कला क्षेत्राची आवड असलेल्या सर्व तरुणांसाठी युवराज आज प्रेरणादायी आदर्श आहे. (युवराज-9890526413) युवराजला चापडगावकरांच्या वतीने पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा… टिप : सर्वांनी हा सिनेमा एकदा पाहावाच—विशेषतः त्यातील अप्रतिम कला दिग्दर्शन पाहण्यासाठी.
युवराजला विनंती : शक्य असेल तर या सिनेमाचा एक खास शो चापडगावमध्ये लावावा, चापडगावकरांना हा आनंद अनुभवता येईल. ॲड. विकास शिंदे, वृक्षवल्ली ग्रुप, चापडगाव मो. 9604536060



