pub-1628281367759110
Advertisement
ब्रेकिंग

राशीननंतर आता खेड आणि जामखेडमध्येही होणार क्रिकेट स्टेडियम

‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’ आणि आ. रोहित पवार यांचा संयुक्त उपक्रम

Samrudhakarjat
4 4 3 3 9 1

कर्जत-जामखेड, ता. १५ – कर्जत-जामखेड मतदारसंघात राशीनसह खेड आणि जामखेड अशा तीन ठिकाणी क्रिकेट स्टेडियमची उभारणी करण्यात येणार आहे. राशीन आणि खेड या ठिकाणी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आणि आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून तर जामखेड या ठिकाणी आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून स्वखर्चातून स्टेडियमची उभारणी करण्यात येणार आहे. 

गेल्या तीन वर्षांपासून ‘महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन’च्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात किक्रेट खेळाडूंसाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. राज्यात आतापर्यंत गहुंजे (पुणे), धुळे (कुंडाणे) आणि लातूर या तीनच ठिकाणी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मालकीचे ग्राऊंड आहेत. परंतु महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून आता राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये ग्राऊंड उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. काही जिल्ह्यात जागा खरेदी करण्यापासून तर काही जिल्ह्यात विविध संस्था-संघटनांच्या मालकीच्या असलेल्या ग्राऊंडचा आवश्यक तो विकास करून किंवा जागा लीजवर घेऊन तिथे ग्राऊंडची बांधणी करुन त्याची मालकी एमसीएकडे घेण्यात येत आहे. त्यानुसार त्या-त्या जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंना सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. अशा पद्धतीने सोलापूर येथे महापालिकेच्या मालकीचे स्टेडियम एमसीएने चालवण्यासाठी घेतले असून सातारा, कोल्हापूरसह इतरही जिल्ह्यांमध्ये असे काम सुरु आहे. 

तसेच एमसीएच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांपासून आयपीएलच्या धर्तीवर सुरवातीला एमपीएल आणि मागील वर्षापासून एमपीएलसोबतच महिला एमपीएल स्पर्धा भरवून संपूर्ण राज्यभरातील गुणी आणि होतकरु खेळाडूंना मोठी संधी उपलब्ध करुन दिली जात आहे. याच स्पर्धेत खेळणाऱ्या काही खेळाडूंची निवड राष्ट्रीय पातळीवर झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात राशीन (ता. कर्जत) येथे भव्य असे क्रिकेट ग्राऊंड उभारण्याची घोषणा आमदार रोहित पवार यांनी केली होती आणि मागील वर्षी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार रोहित शर्मा यांच्या हस्ते या ग्राऊंडचे भूमिपूजनही करण्यात आले आहे. त्यासाठी आमदार रोहित पवार हे सदस्य असलेल्या ‘रयत’ने जागा उपलब्ध करुन दिली आहे. या ग्राऊंडच्या काही परवानग्या मिळवण्यासाठी तसंच मे २०२५ पासून पाऊसच सुरु असल्याने या ग्राऊंडचे काम अद्याप सुरु झाले नाही. परंतु आता ते लवकरच सुरु होणार आहे.

राशीनच्या या ग्राऊंडसह खेड (ता. कर्जत) येथेही आ. रोहित पवार आणि एमसीएच्या माध्यमातून ग्राऊंड तयार करण्यात येणार आहे. खेडमध्ये मा. आ. डॉ. कुमार सप्तर्षी हे अध्यक्ष असलेल्या ‘भारतीय समाज विकास संस्थे’च्या लोकनायक जयप्रकाश नारायण विद्यालयाने या ग्राऊंडसाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे. तसेच जामखेड तालुक्यातही आमदार रोहित पवार हे स्वखर्चातून भव्य अशा क्रिकेट ग्राऊंडची उभारणी करणार असून त्यासाठी जागाही निश्चित करण्यात आली आहे. लवकरच या ग्राऊंडच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे. या तीनही ग्राऊंडची उभारणी झाल्यानंतर कर्जत-जामखेड या दोन्ही तालुक्यातील क्रिकेट खेळाडूंप्रमाणेच राज्यातील ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंनाही पायाभूत सुविधा उपलब्ध होणार आहेत.

‘‘राज्यात अनेक होतकरू आणि गुणी खेळाडू असून त्यांच्यात मोठ्या प्रमाणात पोटेन्शिअल आहे. त्यांना केवळ पायाभूत सुविधा आणि योग्य संधीची गरज आहे. ती मिळाली तर तेही राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर चमकल्याशिवाय राहणार नाहीत. त्यासाठी संपूर्ण राज्यभरातील क्रिकेट खेळाडूंना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न असून यामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचं मोठं सहकार्य आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात डॉ. कुमार सप्तर्षी साहेब यांच्या संस्थेने आणि ‘रयत’ने जागा देऊ केल्यामुळं तिथं हे ग्राऊंड बनवण्यात येत आहे. हे ग्राऊंड झाल्यानंतर येथील खेळाडूही राज्याचा नावलौकिक वाढवल्याशिवाय राहणार नाहीत, असा विश्वास आहे.’’

– रोहित पवार (अध्यक्ष, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, आमदार, कर्जत-जामखेड)

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे
pub-1628281367759110

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker