कोपर्डी गावचा आदर्श उपक्रम! माजी विद्यार्थ्यांकडून शाळेसाठी ३ सुसज्ज वर्ग खोल्यांची भेट


अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या मिशन आपुलकी या नावीन्यपूर्ण उपक्रमांतर्गत , जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोपर्डी येथे माजी विद्यार्थी तसेच गावातील प्रतिष्ठित ग्रामस्थ आणि गावातील प्रमुख पदाधिकारी यांचा स्नेह मेळावा दिवाळी पाडव्याच्या दिवशी उत्साहात पार पाडला .
स्नेह मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी गावातील ज्येष्ठ नागरिक माननीय श्री. झुंबरशेठ सुद्रिक हे होते . यावेळी गावातील ग्रामस्थ व पालकांना शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसहभागाचे आवाहन करण्यात आले या आवाहनाला प्रतिसाद देत कोपर्डी गावचे सुपुत्र आणि सुरत येथील प्रसिद्ध उद्योजक श्री. ज्ञानेश्वर (माऊली ) दत्तात्रय सुद्रिक , पुणे येथील प्रसिद्ध कायदेतज्ञ मा . श्री. दीपक झुंबर शेठ सुद्रिक आणि पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक इंजिनियर श्री. अशोक बाजीराव सुद्रिक या त्रिमूर्तींनी शाळेसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे तीन सुसज्ज वर्ग खोल्या ( अंदाजे रुपये तीस लक्ष)बांधून देण्याचे मान्य करून तात्काळ आगाऊ रक्कम म्हणून प्रत्येकी रु. पाच लक्ष याप्रमाणे रुपये पंधरा लक्ष रुपयांचा धनादेश स्थानिक बांधकाम समितीकडे सुपूर्द केला .

या प्रसंगी उपस्थित अनेक मान्यवरांनी स्वच्छ सुंदर आणि आदर्श शाळा बनविण्यासाठी लागेल ती मदत देण्याचे मान्य केले. या कार्यक्रमासाठी कोपर्डी गावचे विद्यमान सरपंच श्री. शांतीलाल सुद्रिक. माजी सरपंच श्री. सतीशभाऊ सुद्रिक तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. पोपटराव सुद्रिक यांच्यासह अनेक माजी विद्यार्थी , गावचे उपसरपंच ,ग्रामपंचायतचे आजी-माजी सदस्य , सेवा सोसायटीचे आजी-माजी चेअरमन , सदस्य तसेच ग्रामस्थ शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते.




