कर्जत तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा एल्गार: एमआयडीसी रद्द करण्याची मागणी

(समृद्ध कर्जत प्रतिनिधी ) :- कर्जत तालुक्यातील कोंभळी-थेरगाव-रवळगाव एमआयडीसीला खांडवी आणि परिसरातील सर्वसामान्य शेतकऱ्यांनी प्रखर विरोध दर्शवला असून, शासनाने चुकीच्या पद्धतीने शेतजमिनींच्या उताऱ्यावर नोंद लावल्याचा निषेध करण्यात आला. मंगळवारी शेतजमीन बचाव कृती समितीच्या वतीने आंदोलन करून तालुका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींविरोधात रोष व्यक्त करण्यात आला.
कर्जत-जामखेड मतदारसंघासाठी एमआयडीसीच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी प्रशासनाकडून कोंभळी-थेरगाव आणि रवळगाव परिसरातील जमिनींचे अधिग्रहण सुरू आहे. मात्र, यास स्थानिक शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. मंगळवारी खांडवी परिसरातील शेतकऱ्यांनी महिलांसह आंदोलन करत, शेतजमीनींच्या उताऱ्यावर ‘विक्री करण्यास मनाई’ अशी नोंद लावल्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
शेतकऱ्यांनी “एमआयडीसी रद्द करा”, “आमच्या काळ्या आईचा सौदा रद्द करा”, “सुपीक जमिनीतून एमआयडीसी हद्द पार करा”, “बेकायदेशीर एमआयडीसीला १००% विरोध” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, जमिनींच्या अधिग्रहण प्रक्रियेसंदर्भात कुठलीही पूर्वकल्पना देण्यात आलेली नाही आणि शेतकऱ्यांची संमती न घेता 1961 च्या कलम 32 अंतर्गत जमिनींचे हस्तांतरण बळजबरीने करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या भावना आणि मागण्या :- शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर आक्षेप घेतला असून, त्यांच्या म्हणण्यानुसार एमआयडीसीच्या प्रकल्पासंदर्भात ग्रामपंचायत किंवा स्थानिक नागरिकांना कुठलीही सूचना दिली गेली नाही. तसेच, एमआयडीसीच्या माध्यमातून बाहेरच्या लोकांना रोजगार मिळणार असून, स्थानिकांना याचा फायदा होणार नाही. याशिवाय, या प्रकल्पामुळे गावात प्रदूषण वाढेल, स्थानिक पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होईल आणि सुपीक जमिनी उद्ध्वस्त होतील, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
शेतकरी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की, “कोणत्याही लोकप्रतिनिधींनी आमच्या जमिनींबाबत चर्चा केलेली नाही. आमच्या जमिनींवर अन्याय होत असून, आम्ही हा लढा कायमस्वरूपी उभा करणार आहोत. आमच्या पाण्याचा प्रश्न सोडवला नाही, रोजगार दिला नाही, तरी आम्हाला एमआयडीसी नको आहे.”
आंदोलनात सहभागी शेतकरी : सुमन तापकीर, लता तापकीर, वैशाली तापकीर, शितल तापकीर, संगीता तापकीर, वंदना तापकीर, प्रमोद तापकीर, प्रदीप तापकीर, मिनीनाथ तापकीर, सुरेखा तापकीर, भारती गांगर्डे, मिरा तापकीर, निता तापकीर, सविता तापकीर, मनीषा तापकीर, अश्विनी तापकीर, राणी तापकीर, नंदा वायसे, अमित शेलार, भाऊसाहेब गोरखे, ऋषी गोरखे, पिन्टू उदमले इत्यादी शेतकऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला.
शेतकऱ्यांनी ठाम भूमिका घेत, जर प्रशासनाने एमआयडीसीसाठी जमीन अधिग्रहणाचा निर्णय मागे घेतला नाही, तर अधिक तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे. गावातील नागरिकांनी लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचा इशाराही दिला आहे.