पर्यावरण रक्षण काळाची गरज… प्राचार्य डॉ. संजय नगरकर

रयत शिक्षण संस्थेचे, दादा पाटील महाविद्यालयामध्ये सर्व सामाजिक संघटना आणि दादा पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पर्यावरण पूरक होळी व रंगपंचमी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांच्या कल्पकतेतून महाविद्यालयात पर्यावरण रक्षणाचे धडे विद्यार्थ्यांना देणे गरजेचे आहे या हेतूनेच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने अनिल तोरडमल यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, होळी सण साजरा करताना लाकडाचा वापर न करता पालापाचोळ्याचा वापर करावा. रंगपंचमी साजरी करताना रासायनिक रंगाचा वापर न करता मुलतानी माती व जास्वंदाची फुले यापासून बनवलेला नैसर्गिक रंग वापरावे असे आव्हान त्यांनी केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी मनोगतामध्ये सांगितले की, ग्लोबल वार्मिंगच्या वाढत्या प्रभावामुळे आज आपण सर्वांनी सावध होण्याची गरज आहे. रासायनिक रंगामुळे आरोग्यास धोका असल्याचे सांगून रंगपंचमीच्या वेळी नैसर्गिक रंग वापरावे असे सर्वांना आवाहन केले. प्रत्येकाने पर्यावरणाचे रक्षण करण्याची शपथ घेऊन स्वतःपासून सुरुवात करून आपले कुटुंब, मित्र, नातेवाईक या सर्वांना पर्यावरणपूरक होळी व रंगपंचमी साजरी करण्यासंदर्भात विनंती करावी असे आवाहन त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये केले.
पर्यावरण पूरक रंगपंचमी कशी साजरी करावी हा संदेश देण्यासाठी महाविद्यालयातील एका भिंतीवर नैसर्गिक रंग वापरून सर्वांनी हाताचे ठसे उमटवले व पर्यावरण पूरक रंगपंचमी साजरी केल्याचा आनंद लुटला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. वैभव वर्डूळे यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रा. अगस्ती तोरडमल यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर सेवक व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.