कर्जतच्या कोटा शाळेचे शिक्षक अशोक आजबे यांचा खून

समृध्द कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत, ता.१३ तालुक्यातील मिरजगाव – कर्जत रस्त्यावर चिंचोली काळदातजवळ शिक्षकावर लाकडी दांडक्याने प्राणघातक हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शिक्षकाचा मृत्यू झाला. समवेत दुचाकीवर असलेली पत्नी आणि दोन मुले मात्र हल्ल्यातून बचावली. ही घटना सोमवारी (ता.१२) रात्री साडेआठ ते नऊच्या सुमारास घडली. कर्जत शहरातील कोटा मेंटॉर्स या संस्थेतील शिक्षक अशोक प्रभाकर आजबे (वय ३३, रा. शिराळ, ता. आष्टी, जि. बीड, हल्ली कर्जत) हे पत्नी आणि
दोन मुलांसह मिरजगाव-कर्जत रस्त्यावरून कर्जतच्या दिशेने येत होते. चिंचोली काळदात गावाजवळील लवणात आले असता मागून दुचाकीवर येणाऱ्या आरोपींनी लाकडी दांडक्याने डोक्यावर पाठीमागून जोरदार प्रहार केला. त्यात अशोक आजबे यांचा मृत्यू झाला. याबाबत त्यांच्या मामाने खबर दिली. रात्री उशिरापर्यंत फिर्याद नोंदविण्याचे काम सुरू होते. आरोपींच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना झाली. यातील एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे समजते. उपविभागीय पोलिस अधिकारी विवेकानंद वाखारे यानी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली.