पारधी समाजाच्या घरांवर अन्याय; वंचित बहुजन आघाडीचा भूमी अभिलेख कार्यालयासमोर जागरण गोंधळ आंदोलन.

(कर्जत प्रतिनिधी) :- सोमवार, दिनांक 30/12/2024 रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत मौजे निमगाव डाकू शिवारातील गट क्रमांक 143 आणि 144 या गायरान जमिनीमध्ये राहत असलेल्या पारधी समाजावर झालेल्या अन्यायाबाबत कर्जत येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या दालनात कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराविरोधात जागरण-गोंधळ आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामध्ये वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ता अॅड. अरुण (आबा) जाधव यांनी उपस्थित राहून भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांना जाब विचारला. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या चाललेल्या मनमानी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी ते बोलताना म्हणाले की, “पारधी समाज हा ऊसतोड कामगार असून, पोटाची खळगी भरण्यासाठी ते बाहेरगावी कारखान्यांवर काम करतात. त्यांच्यावर होत असलेला अन्याय कोणताही कार्यकर्ता खपवून घेणार नाही.”
सदर सौर प्रकल्पाचे काम 50 वर्षांपासून राहत असलेल्या पारधी समाजाच्या स्मशानभूमीवर तसेच त्यांच्या घरांच्या जागेवर, कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता, जबरदस्तीने सुरू करण्यात आले. हे काम तात्काळ थांबवण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली.
सौर प्रकल्प हा वीज महामंडळाचा वीज विकण्याचा धंदा असून, महाराष्ट्र सरकारने वीज प्रकल्पांसाठी स्वतंत्र जमिनी खरेदी कराव्यात. गाई-गुरांसाठी राखीव असलेल्या गायरान जमिनी गोरगरीब जनतेसाठी राखून ठेवाव्यात. मात्र, सरकार बेकायदेशीरपणे गायरान जमिनी विनाअट आणि विना मोबदला सौर प्रकल्पांसाठी देत आहे. हा सावळा गोंधळ वंचित बहुजन आघाडी सहन करणार नाही, असा इशारा अॅड. अरुण (आबा) जाधव यांनी दिला.
तसेच, अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी गायरान जमिनींवर सौर प्रकल्पांचे बेकायदेशीर प्रकल्प उभे केले जात आहेत. या बेकायदेशीर कारभाराविरोधात जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असेही जाधव यांनी सांगितले.
आंदोलन सुरू होताच भूमी अभिलेख कार्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक पाटील साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी निमगाव डाकू येथे तातडीने भेट देऊन जमिनीची मोजणी केली. सौर प्रकल्पासाठी जागा निश्चित करून दिली आणि आंदोलन स्थगित करण्यासाठी लेखी आश्वासन दिले.
भटक्या-विमुक्त आदिवासी पारधी समाजाला न्याय देण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन 16 डिसेंबरपासून कर्जत तहसील कार्यालयासमोर सुरू झाले होते. जागरण-गोंधळ आंदोलनाने त्याचा समारोप करण्यात आला.
आंदोलन संपल्यावर पारधी समाजातील अन्यायग्रस्त कुटुंबांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून आले. या आंदोलनात राजू शिंदे, राहुल पवार, राहुल काळे, शुभांगी गोहेर, शितल काळे, विजया काळे, सुनीता काळे, कौसाबाई काळे, उज्ज्वला काळे, पुनम काळे, दिशेना पवार, सर्वेनाथ काळे, सागर पवार, निलेश काळे, पिंटू पवार आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांचे आभार जिल्हा उपाध्यक्ष दीपक ससाने यांनी मानले.