कर्जत तालुक्यामध्ये अपघातांचे सत्र सुरूच – एका तासात दोन अपघात,

कर्जत (प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील चिंचोली काळदात येथे निखिल कन्स्ट्रक्शनच्या हलगर्जीपणामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. आज संध्याकाळी अवघ्या एका तासात दोन अपघात झाले, ज्यामध्ये दुचाकीस्वार अविनाश दवंडे आणि त्यांचे सहकारी गंभीर जखमी झाले, तसेच दुसऱ्या अपघातात एका अन्य अल्टो गाडी अपघात झाला असून जखमी झाले आहे.
पहिल्या अपघातात दवंडे यांचा पाय फ्रॅक्चर झाला असून, त्यांच्यावर कर्जत येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर दुसऱ्या अपघातात असलेल्या व्यक्ती गंभीर जखमी झाले आहे.
पुलाच्या कामामुळे अपघात वाढले – सुरक्षेच्या उपाययोजना नाहीत! निखिल कन्स्ट्रक्शनने चिंचोली काळदात येथे रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. मात्र, १५ दिवसांपूर्वी सुरू झालेल्या पुलाच्या कामामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या आठ दिवसांत येथे तब्बल आठ अपघात झाले असून, आज एका तासातच दोन अपघात झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सुरक्षेचे नियम पाळले जात नाहीत. ना सूचना फलक, ना दिशादर्शक, ना रस्त्याच्या कडेला रिफ्लेक्टर्स! अचानक खड्डे खोदले जात आहेत, अपघात टाळण्यासाठी कोणतेही प्रतिबंधक उपाय करण्यात आलेले नाहीत.
या गंभीर परिस्थितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष रघु आबा काळदाते यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने हस्तक्षेप करून सुरक्षेच्या उपाययोजना केल्या नाहीत, तर आम्ही तीव्र आंदोलन करू!”
पुलाच्या कामाला पंधरा दिवस झाले असूनही प्रशासन आणि निखिल कन्स्ट्रक्शनने अद्याप कोणतीही सुरक्षात्मक उपाययोजना केलेली नाही. या निष्काळजीपणामुळे भविष्यात आणखी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कारवाई करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.