दादा पाटील महाविद्यालयात ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा

‘वाचनाचे व्यसन जोपासले पाहिजे. ज्या महापुरुषांमुळे आपण शिकलो, त्यांच्याविषयी आदरभाव ठेवा. महापुरुष कोणत्याही जातीसाठी अथवा समाजासाठी काम करत नव्हते. वयानुसार शहाणपण येत असते. ज्येष्ठ व्यक्तींकडे व गाव खेड्यातील माणसांकडे संस्काराचा खजिना असतो’ असे प्रतिपादन अहिल्यानगर येथील कवी, कथाकार व समीक्षक डॉ. संजय बोरुडे यांनी व्यक्त केले.
ते रयत शिक्षण संस्थेच्या दादा पाटील महाविद्यालयामध्ये मराठी विभाग व शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मराठी भाषा गौरव दिना’निमित्त ‘कवितेवर बोलू काही’ याविषयावर आयोजित केलेल्या व्याख्यानात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर होते.
‘कवितेवर बोलू काही’ याविषयी बोलताना डॉ. संजय बोरुडे म्हणाले की, स्वतःचा सन्मान करायला शिका. कृत्रिमतेपेक्षा नैसर्गिक जगण्याला प्राध्यान्य द्या. याप्रसंगी त्यांनी आई, वडील, प्रेम, समाजवास्तव, लोकगीते अशा विविध विषयांवर स्वरचित कवितांचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी सांगितले की, मातृभाषेला आपल्या जीवनात अमूल्य स्थान आहे. मराठी भाषा कानापासून मनापर्यंत पोहोचते. जगणे हे एक काव्य आहे. वेदनेच्या मुळाशी साहित्य असते. भाषा आपल्याला घडविते. मराठी भाषा संवर्धन करण्याचे काम स्त्रीने केले आहे. भाषा जोपर्यंत वापरात आहे तोपर्यंत नष्ट होऊ शकत नाही. वेदनेतून सुंदरतेची निर्मिती होत असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी शब्बीर शेख यांनीही मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाकरिता डॉ. शिवाजी शिंदे, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. संजय ठुबे, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य प्रा. भागवत यादव महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होता.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा .सुखदेव कोल्हे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.सीमा डोके व आभार डॉ. भारती काळे यांनी मानले.