आमदार रोहित पवार यांच्या हस्ते कर्जत तालुका विज्ञान-गणित प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न

कर्जत प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील कोटा मेंटॉर्स प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कर्जत येथे 2 जानेवारी 2025 ते 4 जानेवारी 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या 52 व्या विज्ञान-गणित प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या शैक्षणिक प्रकल्पांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. त्यांनी सादर केलेले प्रकल्प विज्ञान व गणितातील नवनवीन कल्पना आणि सर्जनशीलता यांचे उत्कृष्ट उदाहरण ठरले.
उद्घाटन समारंभात आमदार रोहित पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांचे कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांना आव्हानात्मक विषयांवर काम करत राहण्याचा सल्ला देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात प्राचार्य केशव आजबे यांनी मोठे आणि भावपूर्ण मनोगत व्यक्त केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे विशेष कौतुक करत म्हटले, “विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रकल्प त्यांच्या कल्पकतेची साक्ष देतात. विज्ञान आणि गणित हे केवळ शाळेतील विषय नसून समाजाच्या प्रगतीचा पाया आहेत. अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासाला चालना मिळते आणि त्यांना त्यांच्या क्षमतांची ओळख होते. विद्यार्थ्यांमध्ये असलेली ऊर्जा आणि सुर्जनशीलता पाहून मला खात्री आहे की भविष्यात हे विद्यार्थी आपल्या महाराष्ट्राला उच्च स्तरावर नवी ओळख देतील.”
यावेळी भारगाव सर,नगराध्यक्ष उषा राऊत बाळासाहेब साळुंखे, यांनीही आपले मनोगत व्यक्त केले
विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रदर्शनाला रंगत आणली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीम, नृत्य आणि कलाकृतींनी उपस्थितांचे मनोरंजन केले.
या प्रसंगी नगरसेविका, नगरसेवक, शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी, स्थानिक पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.