राशीनमध्ये ‘आईसाहेब ट्रेडर्स’ मिरची दालनाचा भव्य शुभारंभ.


राशीन (प्रतिनिधी : जावेद काझी)
येथील ‘आईसाहेब ट्रेडर्स’ या मिरची दालनाचा भव्य शुभारंभ आणि उद्घाटन सोहळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माननीय सभापती काकासाहेब तापकीर यांच्या शुभहस्ते आज उत्साहात संपन्न झाला. या दालनाच्या माध्यमातून राशीन आणि परिसरातील दुकानदारांना तसेच ग्राहकांना विविध प्रकारच्या मिरच्या घाऊक (होलसेल) आणि किरकोळ (रिटेल) दरात उपलब्ध होणार आहेत.
या उद्घाटन प्रसंगी युवा नेते शहाजीराजे राजेभोसले, आंध्रा येथील प्रसिद्ध मिरची व्यापारी अल्लाउद्दीन शेख, सयदा शेख, तसेच दत्तात्रय झगडे, रमेश सायकर, अजिनाथ मोढळे, नारायण जगदाळे, सचिन मोहोळकर, मालोजीराजे भिताडे, रावसाहेब पंडित, औदुंबर देवगावकर, कैलास राऊत यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक मंडळ, सचिव, सहसचिव, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, शेतकरी, हमाल-मापाडी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘सामान्य बाजारकरी ते यशस्वी उद्योजक’ असा प्रेरणादायी प्रवास
व्यासपीठावरून बोलताना माजी सभापती काकासाहेब तापकीर म्हणाले, “अमोल ननवरे यांचा जन्म एका अत्यंत सर्वसामान्य कुटुंबात झाला. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आई मताबाई यांनी अत्यंत बिकट परिस्थितीत प्रपंचाचा गाडा हाकत दोन्ही मुलांचा सांभाळ केला. समाजात जगताना पैशाचे महत्त्व काय असते, हे त्यांनी लहानपणापासूनच मुलांना कष्टातून शिकवले. कष्टाची अजिबात लाज न बाळगता अमोल व लखन या दोन्ही भावांनी स्वतःचे उद्योग उभे केले. एका सामान्य बाजारकऱ्यापासून सुरू झालेला अमोल ननवरे यांचा हा प्रवास आज एका यशस्वी उद्योजकापर्यंत पोहोचला आहे, हा प्रवास सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.”

यावेळी छोटे व्यावसायिक महेश सपकाळ यांनी पत्राद्वारे (चिट्ठीद्वारे) भावना व्यक्त करताना सांगितले की, “सुरुवातीच्या काळात आमच्यासारख्या नवउद्योजकांना अमोल ननवरे यांनी नेहमीच मोलाचे सहकार्य केले. आज आम्ही व्यापारपेठेत इथपर्यंत पोहोचलो आहोत, त्याचे श्रेय अमोल ननवरे यांनाच जाते.”
कार्यक्रमादरम्यान काकासाहेब तापकीर, शहाजीराजे राजेभोसले, कैलास राऊत आणि औदुंबर देवगावकर यांनी आपल्या भाषणातून अमोल ननवरे यांना भावी वाटचालीस व व्यवसायास मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मालोजीराजे भिताडे यांनी कुशलतेने केले, तर उपस्थितांचे आभार अमोल ननवरे यांनी मानले.



