कर्जत मध्ये खासगी रुग्णालयांच्या मनमानीविरोधात ‘घंटानाद’
३६ हॉस्पिटलची तपासणी; १८ रुग्णालयांत आढळल्या त्रुटी!


(कर्जत प्रतिनिधी) :- कर्जत तालुक्यातील रुग्णालयांमध्ये उपचारांचे दरपत्रक व डॉक्टरांची वैद्यकीय पात्रता दर्शनी भागावर लावणे, रुग्णांकडून जादा व अवाजवी शुल्क आकारू नये, अनावश्यक तपासण्या व उपचार लादू नयेत, तसेच खासगी लॅब व रुग्णालयांची तपासणी करावी, यासह विविध मागण्यांसाठी युवक क्रांती दलाच्या वतीने सोमवारी (दि. २१) कर्जत पंचायत समिती कार्यालयासमोर एकदिवसीय लक्षवेधी घंटानाद आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात युक्रांदच्या कार्यकर्त्यांसह विविध पक्ष, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.
आंदोलनादरम्यान तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे, डॉ. दिलीप व्हरकटे व डॉ. मारुतराव जाधव, डॉ. अशोक लिंगडे यांनी आंदोलकांशी सविस्तर चर्चा केली. युक्रांदने यापूर्वी केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे यांनी तालुक्यातील ३६ हॉस्पिटलची तपासणी केली. त्यामधील १८ हॉस्पिटल्समध्ये त्यांना विविध त्रुटी आढळून आल्या. त्रुटी आढळलेल्या हॉस्पिटल चालकांना लेखी पत्र दिल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिली. इतर खासगी रुग्णालयांची तपासणीही सुरू आहे. त्रुटी आढळलेल्या रुग्णालयांमध्ये आवश्यक बदल न झाल्यास शासकीय नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे लेखी पत्र तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता आंदोलन स्थगित करण्यात आले.

दरम्यान, गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी यांनीही आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. जनतेच्या आरोग्यविषयक विविध मागण्या घेऊन युक्रांदने आंदोलनाद्वारे प्रशासनाचे लक्ष वेधले.
या आंदोलनास वंचित बहुजन आघाडीचे पोपट शेटे, लखन पारसे, अंकुश साळवे, भाऊसाहेब जावळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सुभाष जाधव, जितेंद्र शेटे, राशीन येथील स्वप्नपूर्ती युवा ग्रामविकास प्रतिष्ठानचे विकी साळवे, मराठा सेवा संघाचे दिलीप कानगुडे यांच्यासह अनेकांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.




