कर्जतच्या सामाजिक शिलेदारांची आष्टीत विशेष उपस्थिती!
‘रोज एक तास श्रमदानासाठी’ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; आमदार सुरेश धस यांच्या हस्ते शुभारंभ


(कर्जत प्रतिनिधी) : – स्वच्छ, सुंदर, हिरवेगार आणि विकसित शहराच्या निर्मितीसाठी ‘रोज एक तास श्रमदानासाठी’ या अभिनव मोहिमेचा शुभारंभ आज आष्टी येथील पिंपळेश्वर मंदिर परिसरात आमदार सुरेश धस यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला.
शहराचा विकास आणि स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी आहे, या भावनेतून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. दररोज एक तास श्रमदानाच्या माध्यमातून वृक्षारोपण, झाडांचे संवर्धन, परिसर स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाची विविध कामे केली जाणार आहेत.

या विशेष उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी कर्जत तालुक्याचे नाव वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, स्वच्छता आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून महाराष्ट्रासह विविध देशांत पोहोचविण्यासाठी कार्यरत असलेल्या कर्जत शहरातील विविध सामाजिक संघटनांचे शिलेदार विशेष उपस्थित होते. त्यांनी आष्टीकरांसोबत श्रमदानात सहभागी होत सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला.
कर्जत शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि विविध सामाजिक संघटनांच्या सदस्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून ‘एक तास समाजासाठी’ हा संदेश दिला. त्यांच्या या सहभागाबद्दल आमदार सुरेश धस यांच्या उपस्थितीत सहभागी सामाजिक संघटनांच्या शिलेदारांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

दररोजचा एक तास श्रमदानासाठी दिल्यास परिसराच्या स्वच्छतेसोबतच पर्यावरण संवर्धनाला मोठी चालना मिळू शकते. त्यामुळे आष्टी शहरातील नागरिकांनी, सामाजिक संघटनांनी, व्यापाऱ्यांनी आणि युवकांनी मोठ्या संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.
नागरिकांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता स्वच्छ, सुंदर, हिरवेगार आणि विकसित आष्टीचे स्वप्न साकार करण्यासाठी ‘रोज एक तास श्रमदानासाठी’ ही मोहीम निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
आष्टी : पिंपळेश्वर मंदिर परिसरात ‘रोज एक तास श्रमदानासाठी’ मोहिमेचा शुभारंभ आमदार सुरेश धस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कर्जत शहरातील विविध सामाजिक संघटनांचे शिलेदार विशेष उपस्थित राहून उपक्रमात सहभागी झाले. सहभागी सामाजिक कार्यकर्त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.




