जंगलात आढळला तरुणीचा अर्धवट जळालेला मृतदेह; श्रीगोंद्यातील वडाळी रोड परिसरातील घटना

(कर्जत प्रतिनिधी) :- चारित्र्याच्या संशयावरून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लोखंडी रॉड व फर्शीने डोक्यात मारून निर्घृण खून केल्याची आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह जंगलात नेऊन जाळल्याची धक्कादायक घटना श्रीगोंदा शहरात उघडकीस आली आहे.
याप्रकरणी मुख्य संशयित आरोपी, त्याचे वडील आणि आई यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलगी गेल्या काही महिन्यांपासून श्रीगोंद्यातील काळकाई चौक परिसरात मुख्य आरोपी शुभम सुखदेव ओव्हाळ याच्यासोबत राहत होती. त्यांच्यात वारंवार वाद होत असत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जून २०२६ रोजी दुपारी २ ते ३ वाजेच्या सुमारास काळकाई चौक येथील राहत्या घरी चारित्र्याच्या संशयावरून आरोपी शुभम आणि पीडित मुलगी यांच्यात जोरदार वाद झाला. या वादातून रागाच्या भरात आरोपीने मुलीला लोखंडी रॉडने मारहाण केली आणि फर्शीने डोक्यात प्रहार करून तिचा जागीच खून केला. खून केल्यानंतर आरोपीने तिचा मृतदेह घरातच लपवून ठेवला आणि तो अहमदनगर जवळील केडगाव येथे राहणाऱ्या आपल्या आई-वडिलांकडे निघून गेला.

यानंतर, १६ जून रोजी सकाळी मुख्य आरोपी आणि त्याचे वडील सुखदेव ओव्हाळ हे श्रीगोंद्यातील घरी आले. त्यांनी मृतदेह गादीमध्ये गुंडाळून दोरीने बांधला.
१७ जूनच्या मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी हा मृतदेह मोटारसायकलवरून वडाळी रोडवरील जंगलात नेला. तिथे लाकडे गोळा करून आणि पेट्रोल टाकून मृतदेह पेटवून दिला.
पीडित मुलीच्या आईला पोलिसांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. या घटनेप्रकरणी मुलीच्या आईने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुख्य आरोपी शुभम सुखदेव ओव्हाळ, त्याचे वडील सुखदेव ओव्हाळ आणि आई रेखा ओव्हाळ यांच्यासह अन्य संशयित साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

