वादळी वाऱ्याने बेनवडीतील दोन एकर द्राक्षबाग भुईसपाट
शेतकरी भागवत गदादे यांचे सुमारे २० लाखांचे नुकसान


कर्जत (प्रतिनिधी) : – गुढी पाडव्याच्या सायंकाळी कर्जत तालुक्यातील अनेक भागात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या वादळामुळे बेनवडी व शिंदा परिसरात मोठे नुकसान झाले असून बेनवडी येथील शेतकरी भागवत पांडुरंग गदादे यांची तब्बल दोन एकर द्राक्षबाग अक्षरशः भुईसपाट झाली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्याचे सुमारे २० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांसह पावसाने तालुक्यातील अनेक भागात कहर केला. बेनवडी परिसरात वादळाचा वेग अधिक असल्याने भागवत गदादे यांच्या द्राक्षबागेचे मोठे नुकसान झाले. द्राक्ष हंगाम सुरू होण्याच्या अगदी उंबरठ्यावर असताना ही बाग जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

गदादे यांच्या दोन एकर द्राक्षबागेतून यंदा सुमारे ३० टन द्राक्ष उत्पादन होईल, अशी अपेक्षा होती. पुढील आठवड्यात द्राक्ष काढणीस सुरुवात होणार होती. मात्र अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांनी संपूर्ण बाग कोसळवून होत्याचे नव्हते केले. या घटनेमुळे बळीराजा हवालदिल झाला असून आर्थिक फटका मोठा बसला आहे.
दरम्यान, नुकसान झालेल्या द्राक्षबागेचा कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. यावेळी ग्राम महसूल अधिकारी प्रियंका भोर, सहाय्यक कृषी अधिकारी डी. एस. लगड, मंडल कृषी अधिकारी सुनील आडसूळ, ग्रामपंचायत अधिकारी संगीता घोडेकर, पोलीस पाटील सुभाष गायकवाड, माजी सरपंच महादेव गदादे, ज्ञानदेव गदादे आदी उपस्थित होते.

अवकाळी वादळामुळे झालेल्या या नुकसानीची दखल घेऊन शेतकऱ्याला तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.



