मुख्य रस्त्यावरील अनेक हॉटेल व ढाब्यांवर बेकायदेशीरित्या दारू विक्री जोमात

कर्जत प्रतिनिधी : – जिल्हा पोलिस प्रशासनाकडून अवैधपणे दारू विक्रेत्यांवर कारवाई होत आहे परंतु त्यांच्या अखत्यारीत येत असलेल्या कोंभळी फाटा ते खेड पर्यंत अनेक ढाब्यावर व हॉटेलमध्ये सर्रास दारू विक्री होत आहे. यंत्रणेसह सामाजिक कार्यकर्तेही या अवैध वसुलीत व्यस्त असल्याने कारवाई फक्त नावापुरतीच असल्याचेही चित्र आहे. एकीकडे कारवाई तर दुसरीकडे सुट असे दुटप्पी धोरण जिल्हा यंत्रणा राबवीत आहेत का असा प्रश्नही सुज्ञ नागरिकांना पडला आहे. जिल्ह्यात पोलिस विभागाचे नवे सेनापती रुजू झाल्यानंतर अवैध धंद्यांना आळा बसवण्याचे धोरण आखण्यात आले. विविध मोहीम राबवून अनेक गुन्ह्यांवर आळाही घालण्यात आला. मात्र प्रत्यक्षात होत असलेली कारवाई व त्यानंतरही सुरू असलेले अवैध धंदे यात शंका कुशंकांना पेव फुटले आहे.
कर्जत तालुक्यातील सर्वच मुख्य रस्त्यावर असलेल्या ढाब्यावर व हाँटेल वर सर्वाचे दुर्लक्ष होत आहे. परमिट किवा परवाना नसतानाही या हाँटेल व ढाब्यांमध्ये दारू विक्री होत आहे.
परवाना नसलेल्या हाँटेलमध्ये व ढाब्यांमध्ये दारू उपलब्ध असते, ही बाब खरंच प्रशासनाच्या कारवाईवर शिक्कामोर्तब करणारी आहे. हाँटेल व ढाब्यांमध्ये या अवैध दारू विक्रीचा व्यवसाय चालत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. उल्लेखनीय म्हणजे काही सामाजिक कार्यकर्ते पोलिसांमधील काही यंत्रणा मिळून चोरी छुपे पद्धतीने वसुली ही करीत असल्याचे बोलल्या जात आहे. मात्र याकडे वरिष्ठ पोलिस यंत्रणेचे लक्ष नसावे? ही गोष्ट अजिबात न पचणारी आहे. कोंभळी फाटा ते खेड या मुख्य मार्गावर अनेक हॉटेल व ढाबे आहेत. याच रस्त्याच्या कडेला असलेल्या हाँटेल व ढाब्यामधून दारुची विक्री होत असल्याचे दिसून येते.
वसूली करतोय तरी कोण?
गत दोन महिन्यांपासून अवैध धंद्यांवर लगाम लावण्यासाठी विविध धाडस राबविण्यात आले. अवैध धंद्यांवर आळाही बसला. मात्र त्यानंतर हळूहळू पूर्वपदावर अवैध धंदे सुरु होत असल्याचे दिसून येत आहे. यातही काही शासकीय यंत्रणेतील कर्मचारी वसुलीसाठी जुंपल्याचे दिसून येते. ही नेमकी वसुली कोण कर्मचारी करतोय याचीही शहानिशा होणे अत्यंत गरजेचे आहे.