राशिन च्या जगदंबा देवी परिसरात नवरात्र निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई.


राशीन ( प्रतिनिधी) जावेद काझी. श्री जगदंबा देवीच्या नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर परिसरात करण्यात आलेल्या मनमोहक व आकर्षक विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला आहे. लखलखत्या दिव्यांच्या जगमगाटामुळे मंदिराचे भव्य शिखर, ऐतिहासिक दीपमाळा आणि संपूर्ण मंदिर परिसर अत्यंत नयनरम्य व मनोहारी दिसत आहे.

श्री क्षेत्रा राशीन येथील कुलस्वामिनी श्री जगदंबा देवीच्या नवरात्रोत्सवाला मोठे धार्मिक महत्त्व आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंदिर व्यवस्थापन व ग्रामस्थांच्या वतीने मंदिर आणि परिसरात विशेष सजावट करण्यात आली आहे. यंदा करण्यात आलेली रंगीबेरंगी विद्युत रोषणाई भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे. रात्रीच्या वेळी लखलखणाऱ्या या दिव्यांमुळे राशीन नगरीत एक वेगळाच उत्साह आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.

“नवरात्रोत्सवाच्या काळात जगदंबा देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी हजारो भाविक येतात. यंदाच्या या मनमोहक रोषणाईमुळे मंदिर परिसराचे सौंदर्य अधिकच खुलले असून भाविकांमधून समाधान व्यक्त होत आहे.”
नवरात्रोत्सवाच्या कालावधीत मंदिरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या विद्युत रोषणाईमुळे एक दिव्य आणि प्रसन्न अनुभव मिळत आहे.




