

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २८ जून २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण १०२८ केंद्रांवर प्रस्तावित असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२६ पुढे ढकलण्यात आली आहे. NEET २०२६ च्या परीक्षेतील गैरप्रकार लक्षात घेऊन सुरक्षा उपाययोजना केलेल्या असतानाही, भिवंडी येथे पहाटे गोपनीय माहितीच्या आधारे प्रश्नपत्रिका फुटल्याचे उघडकीस आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आज, २७ जून २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास भिवंडी येथे काही व्यक्तींकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याची गुप्त बातमी मिळाल्यानंतर भिवंडी पोलिसांनी धाड टाकली. तपासणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना बोलावून तातडीने पडताळणी केली असता, संबंधित व्यक्तींकडील माहिती शिक्षक पात्रता परीक्षा (TET) जून २०२६ च्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्नांशी समान असल्याचे आढळून आले. याप्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गंभीर परिस्थिती लक्षात घेता आणि परीक्षा कोणत्याही परिस्थितीत पूर्ण पारदर्शकपणेच व्हावी या परीक्षा परिषदेच्या आग्रहामुळे तसेच याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने २८ जून २०२६ रोजीची ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. टीईटीचा पेपर परीक्षेच्या पूर्वसंध्येलाच फुटल्याने भावी शिक्षकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. शिक्षक पात्रता (TET) परीक्षेबाबतची अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल…



