कर्जत शहरातील कचरा समस्येबाबत सर्व सामाजिक संघटना कर्जत यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.


कर्जत (प्रतिनिधी) : – कर्जत शहर व परिसरात रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात टाकला जाणारा कचरा, वाढती अस्वच्छता व पर्यावरण प्रदूषण या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी सर्व सामाजिक संघटना कर्जत यांच्या वतीने आज मा. जिल्हाधिकारी मा. श्री. पंकज आशिया साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संघटनेच्या वतीने गेल्या २००० पेक्षा अधिक दिवसांपासून सातत्याने श्रमदानातून वृक्षारोपण व स्वच्छता अभियान राबविले जात असूनही काही ठिकाणी पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार सुरूच आहेत. यामुळे शहराच्या सौंदर्याला बाधा येत असून नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत आहे.
या समस्येवर तात्काळ उपाययोजना करण्यासाठी कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई, संबंधित ठिकाणी CCTV कॅमेरे बसविणे, नियमित स्वच्छता व्यवस्था व कचरा संकलन प्रणाली अद्ययावत करावी आणि जनजागृती मोहीम राबविण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

तसेच हेच निवेदन मा. मुख्याधिकारी, नगरपंचायत कर्जत यांनाही सादर करण्यात आले असून प्रशासनाने या गंभीर विषयाकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
कर्जत शहर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.



