कर्जत-मिरजगावात अवैध दारू विक्रेत्यांवर एलसीबीचा धडाका!
७ जणांवर गुन्हे; ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानंतर विशेष पथकाची धडक मोहीम

कर्जत | प्रतिनिधी अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला वेग आला असून स्थानिक गुन्हे शाखेने कर्जत आणि मिरजगाव परिसरात अवैध दारू विक्रेत्यांवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सात अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून ५५ हजार ५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी विशेष पथकाची स्थापना केली. या पथकात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, पोलीस अंमलदार शामसुंदर ससाणे, आकाश काळे, भाऊसाहेब काळे तसेच चालक चंद्रकांत कुसळकर यांचा समावेश होता.

१० जून २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने कर्जत आणि मिरजगाव पोलीस स्टेशन हद्दीतील सात वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या कारवाईत अवैध दारू विक्री करणाऱ्या सात जणांविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले.
कारवाईदरम्यान कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच ठिकाणी छापे टाकून ४७ हजार २४५ रुपयांचा मुद्देमाल, तर मिरजगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी कारवाई करून ७ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात अवैध दारू व इतर साहित्याचा समावेश आहे.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधातील ही मोहीम पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.


