आमदार रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाची धग कर्जतमध्ये; मंगळवारनंतर कर्जत बंदची हाक!

कर्जत (प्रतिनिधी) : राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी, कर्जमाफीतील जाचक अटी रद्द करणे तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला राज्यभरातून मोठा पाठिंबा मिळत आहे. या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कर्जत शहर युवक अध्यक्ष नामदेव थोरात यांनी जाहीर पाठिंबा देत शासनाला थेट इशारा दिला आहे.
नामदेव थोरात म्हणाले, “आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेले आंदोलन हे केवळ राजकीय आंदोलन नसून लाखो शेतकऱ्यांच्या न्यायाच्या हक्कासाठीची लढाई आहे. राज्य सरकारने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा. अन्यथा मंगळवारपर्यंत समाधानकारक तोडगा न निघाल्यास कर्जत शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला जाईल.”

सध्या पंढरपूर येथे सुरू असलेल्या आंदोलनाला राज्यभरातील शेतकरी संघटना, विविध राजकीय पक्षांचे नेते तसेच सामाजिक संघटनांचा पाठिंबा मिळत असून आंदोलनाची व्याप्ती वाढत आहे. आमदार रोहित पवार यांनी १२ जूनपासून सरसकट कर्जमाफी, पीकविमा योजनांमधील जाचक अटी रद्द करणे आणि शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याच्या मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.

आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्याची माहिती समोर आली असली तरी त्यांनी आपल्या मागण्यांवर ठाम भूमिका कायम ठेवली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
नामदेव थोरात यांनी पुढे सांगितले की, “शेतकरी हा देशाचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आमदार रोहित पवार स्वतःच्या जीवाची पर्वा न करता उपोषण करत आहेत. शासनाने यापुढेही दुर्लक्ष केल्यास कर्जत शहरातील व्यापारी, शेतकरी, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
रोहित पवार यांच्या आंदोलनामुळे राज्यातील शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून शासन या आंदोलनावर काय भूमिका घेते याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

