नगराध्यक्ष सौ. छाया शेलार व गटनेते सतीश पाटील यांचा पोपटभाऊ कुलथे सराफ परिवाराकडून सत्कार; कर्जतच्या विकासासाठी व्यक्त केल्या अपेक्षा


कर्जत नगरपंचायचा नगराध्यक्षपदी सौ. छायाताई सुनील शेलार यांची तसेच गटनेतेपदी श्री. सतीश (काका) पाटील यांची निवड झाल्याबद्दल कर्जत शहरातील प्रसिद्ध सुवर्णपेढी पोपटभाऊ कुलथे सराफचे संचालक अनुजशेठ कुलथे यांच्या वतीने त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दोन्ही मान्यवरांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कर्जत तालुका संघचालक श्री. गजानन चावरे, भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई कुलथे, श्री. रत्नाकर चावरे, नगरसेवक श्री. प्रसाद ढोकरीकर, श्री. आशिष निलंगे, श्री. रामेश्वर शर्मा, सौ. ऋतुजा अनुजशेठ कुलथे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सौ. ऋतुजा अनुजशेठ कुलथे यांनी कर्जत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काही महत्त्वपूर्ण अपेक्षा व्यक्त केल्या. शहरातील लहान मुलांसाठी आधुनिक सुविधा असलेले आकर्षक सार्वजनिक गार्डन उभारण्यात यावे तसेच शहरातील कचरा संकलन व स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम, शिस्तबद्ध आणि प्रभावी करण्यात यावी, अशी त्यांनी मागणी केली.
भाजप महिला आघाडीच्या माजी जिल्हाध्यक्षा श्रीमती जयश्रीताई कुलथे यांनी शुभेच्छा देताना सांगितले की, “मा. सभापती प्रा. राम शिंदे साहेब हे शब्दाला जागणारे, विकासाला सर्वोच्च प्राधान्य देणारे आणि जनतेच्या विश्वासाला कायम न्याय देणारे नेतृत्व आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे कर्जत-जामखेड मतदारसंघात अनेक विकासकामांना गती मिळाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेलाही विकासाची नवी दिशा मिळेल. कार्यकाळ जरी कमी असला, तरी जनतेची सेवा करत ही संधी विकासाच्या सुवर्णअध्यायात रूपांतरित कराल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे.”

यावर उत्तर देताना नगराध्यक्ष सौ. छायाताई शेलार यांनी नागरिकांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. शहरातील विकासकामे, स्वच्छता आणि नागरी सुविधा यांना प्राधान्य देत प्रत्येक कामावर स्वतः लक्ष ठेवून ती वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच त्यांनी सांगितले की, मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कर्जत शहरासाठी ‘नमो गार्डन’ उभारणीसाठी ₹१ कोटींचा निधी मंजूर केला असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन लवकरच मा. सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या शुभहस्ते होणार आहे. या गार्डनमुळे कर्जत शहरातील लहान मुलांसह सर्व नागरिकांना आधुनिक आणि सुंदर विरंगुळ्याची सुविधा उपलब्ध होणार असून, शहराच्या सौंदर्यातही मोठी भर पडणार आहे. याशिवाय कचरा व्यवस्थापन आणि इतर नागरी सुविधांमध्येही गुणवत्तापूर्ण सुधारणा करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थित मान्यवरांनी नगराध्यक्ष सौ. छायाताई शेलार व गटनेते श्री. सतीश (काका) पाटील यांचे अभिनंदन करून त्यांच्या नेतृत्वाखाली, तसेच मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मा. सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत शहर विकासाच्या नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला.


