एमपीएससीतून राज्य कर निरीक्षकपदी निवड; कु. वैष्णवी भारतीचा प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते सत्कार
कर्जतच्या कन्येच्या यशाने परिसरात अभिमानाची भावना


कर्जत (प्रतिनिधी) : – मेहनत, जिद्द आणि अभ्यासाच्या जोरावर स्वप्नांना गवसणी घालणाऱ्या कर्जत तालुक्यातील कु. वैष्णवी राजेंद्र भारती हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षेत यश संपादन करत राज्य कर निरीक्षक (STI) पदावर निवड मिळवली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते तिचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.
यावेळी प्रा. राम शिंदे यांनी वैष्णवीचे कौतुक करत, कठोर परिश्रम आणि चिकाटीच्या बळावर मिळवलेले हे यश अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच पुढील प्रशासकीय सेवेतही प्रामाणिकपणे कार्य करून समाजाचे ऋण फेडावे, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

कु. वैष्णवी ही कर्जत येथील हॉटेल श्रीकृष्णचे संचालक श्री. विकास भारती यांची पुतणी तसेच श्री. राजेंद्र भारती यांची कन्या आहे. तिच्या या यशामुळे कुटुंबीयांसह मित्रपरिवार आणि परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, या सत्कार प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वैष्णवीच्या यशामुळे कर्जत तालुक्याच्या शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




