“मलठणच्या शेख भावंडांची पोलिस दलात दमदार एंट्री”
सलमान, रिजवाना आणि सूरज शेख तिघेही पोलिस सेवेत; जिद्द-मेहनतीच्या जोरावर गावाचा अभिमान उंचावला


कर्जत (प्रतिनिधी) : – जिद्द, कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर मलठण (ता. कर्जत) येथील शेख कुटुंबातील तिन्ही भावंडांनी पोलिस सेवेत भरीव यश संपादन करत गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. सलमान शेख, रिजवाना शेख आणि सूरज अकबर शेख या तिन्ही बहिण-भावांनी पोलिस दलात स्थान मिळवत देशसेवेची जबाबदारी स्वीकारली असून त्यांच्या या यशाबद्दल मलठण ग्रामस्थांनी अभिमान व्यक्त करत अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

मलठण येथील मूळ रहिवासी असलेले आणि सध्या यवत येथे शेतीकामानिमित्त स्थायिक झालेले अकबर अब्दुल शेख यांचे चिरंजीव आणि के जी एन फेब्रिकेशन कलिंदर अब्दुल शेख यांचे पुतणे सलमान अकबर शेख यांची मुंबई पोलिस दलात निवड झाली आहे. त्यांनी पोलिस प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून कर्तव्यावर रुजू होण्यासाठी सज्जता दाखवली आहे. तर त्यांची बहीण रिजवाना शेख या पुणे ग्रामीण पोलिस दलात कार्यरत असून त्यांनीही आपल्या कर्तृत्वाने कुटुंबासह गावाचे नाव उज्ज्वल केले आहे.
याचबरोबर त्यांचा भाऊ सूरज अकबर शेख (पुणे शहर) हाही पोलिस सेवेत कार्यरत असल्याने शेख कुटुंबातील तिन्ही भावंडे देशसेवेसाठी सज्ज झाली आहेत. शिक्षण, मेहनत आणि ध्येयवेड्या प्रयत्नांच्या जोरावर कोणतीही उंची गाठता येते, असा प्रेरणादायी संदेश त्यांनी समाजातील तरुणांना दिला आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे सलमान आणि रिजवाना हे मलठणमधील सुप्रसिद्ध किराणा व्यावसायिक सिकंदर शेख यांचे पुतणे आहेत. शेख कुटुंबातील तिन्ही भावंडे आज पोलिस सेवेत कार्यरत असल्याने हा क्षण कुटुंबासह संपूर्ण मलठण गावासाठी अभिमानाचा ठरला आहे. त्यांच्या या यशामुळे मलठणच्या इतिहासात एक नवा प्रेरणादायी अध्याय लिहिला गेला असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.



