ढेरेमळा येथे अखंड हरिनाम सप्ताहात भक्तीचा जागर; कीर्तनांना भाविकांची मोठी गर्दी
हनुमान जयंतीनिमित्त तीन दिवसांचा आध्यात्मिक सोहळा; नामस्मरण, भजन-कीर्तनांनी परिसर दुमदुमला


कर्जत (प्रतिनिधी) : – अलंकापुरी पुण्यभूमीचे पावन स्मरण करत श्री संत सद्गुरू गोडद महाराज यांच्या पावन भूमीत ढेरेमळा (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) येथे हनुमान जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘अखंड हरिनाम सप्ताहा’ला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. शुक्रवार दि. ३ एप्रिल ते रविवार दि. ५ एप्रिल २०२६ या कालावधीत सुरू असलेल्या या आध्यात्मिक सोहळ्यात नामस्मरण, गाथा भजन आणि कीर्तनांच्या माध्यमातून भक्तीचा जागर होत आहे.
सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवार दि. ३ एप्रिल रोजी रेहेकुरी येथील ह.भ.प. संदीप महाराज तनपुरे यांच्या सुश्राव्य कीर्तनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांच्या ओघवत्या वाणीतील हरिपाठ, अभंग व संतवाङ्मयाच्या विवेचनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. या कीर्तनासाठी ढेरेमळा व परिसरातील मोठ्या संख्येने वारकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

शनिवार दि. ४ एप्रिल रोजी करमाळा येथील ह.भ.प. विनोद महाराज रोकडे यांच्या प्रभावी कीर्तनाने भक्तीमय वातावरण अधिकच रंगले. संत परंपरेचा वारसा आणि हरिनामाची महती सांगताना त्यांच्या कीर्तनाला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या दिवशी सायंकाळी श्री संत सद्गुरू गोडद महाराज यांच्या चरण पादुकांचे ढेरेमळा येथे आगमन झाल्याने वातावरण अधिकच पावन झाले. पादुकांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
सप्ताहाच्या दरम्यान दररोज पहाटे काकडा भजन, विष्णुसहस्त्रनाम, गोडद महाराज चरित्र वाचन, गाथा भजन, हरिपाठ अशा विविध धार्मिक कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झाले आहे. मुक्ताई महिला भजनी मंडळ (शहाजीनगर) व हिरकणी महिला भजनी मंडळ (भांडेवाडी) यांच्या गाथा भजनांनीही भक्तिरसाची रंगत वाढवली.
रविवार दि. ५ एप्रिल रोजी सकाळी पिंपळवाडी येथील ह.भ.प. प्रकाश महाराज जंजिरे यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर संगीत विशारद ह.भ.प. विजय महाराज सकट यांचा विशेष संगीत भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सप्ताहाची सांगता काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने होणार आहे.
या सप्ताहाचे आयोजन नारीशक्ती महिला भजनी मंडळ यांनी केले असून शिवराज तरुण मंडळ, ढेरेमळा यांनी संयोजनाची धुरा सांभाळली आहे. गुरुकृपा वारकरी शिक्षण संस्था (रेहेकुरी) येथील टाळकरी, विणेकरी व मृदंगाचार्य यांची साथसंगत लाभत आहे.
या भक्तिमय सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी ढेरेमळा, नेवसेमळा, समुद्रमळा आणि राजपूतमळा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून संपूर्ण परिसर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेला आहे.




