कर्जतच्या सामाजिक संघटनांना ‘शंभूगौरव सामाजिक पुरस्कार’
किल्ले पुरंदर येथे भव्य शंभूराज्याभिषेक सोहळ्यात सन्मान


कर्जत, दि. — छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा, शौर्याचा व लोककल्याणाच्या ध्येयाचा वारसा जपत शिवपुत्र शंभूराजे राज्याभिषेक ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने दिला जाणारा यंदाचा “शंभूगौरव सामाजिक पुरस्कार” पर्यावरण संवर्धनासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या सर्व सामाजिक संघटना, कर्जत यांना प्रदान करण्यात आला.
हा सन्मान इतिहासप्रसिद्ध किल्ले पुरंदर येथे पार पडलेल्या भव्य, दिव्य व अत्यंत देखण्या श्री शंभूराज्याभिषेक सोहळ्यात
संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष माननीय प्रवीण दादा गायकवाड यांच्या शुभहस्ते सन्मानपूर्वक सुपूर्द करण्यात आला.

वृक्षारोपण, जलसंवर्धन, स्वच्छता मोहिमा, निसर्ग जागृती तसेच सामाजिक सहभागाच्या माध्यमातून “निसर्ग हाच खरा वारसा” या भावनेतून राबविण्यात येत असलेल्या कार्याची ही अधिकृत दखल असल्याचे यावेळी सांगण्यात आले. हा पुरस्कार केवळ सन्मान नसून पर्यावरण रक्षणाच्या लढ्याला मिळालेली प्रेरणादायी पावती असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

या गौरवाबद्दल सर्व सामाजिक संघटना, कर्जत यांच्या वतीने शिवपुत्र शंभूराजे राज्याभिषेक ट्रस्ट, पुणे तसेच माननीय प्रवीण दादा गायकवाड यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. या सन्मानामुळे पर्यावरण रक्षण, पर्यावरण संवर्धन व समाजहिताचे कार्य अधिक जोमाने व व्यापक स्वरूपात सुरू ठेवण्याचा दृढ संकल्प संघटनांनी व्यक्त केला.




